
‘ईडीच्या कारवायांना मी घाबरत नाही. लोकशाही आहे. समोर लोक बसले आहेत. त्या कारवायांना 2024 नंतर उत्तर देऊ. ‘हमारा भी दिन आएगा भाई’, असा इशारा देत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विविध विषयांवर तुफान फटकेबाजी केली.
भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली
महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने भाजप वाढला हे नक्कीच खरं आहे. पण, भाजपची आज विधानसभा किंवा लोकसभेत जी ताकद दिसतेय, त्यातील 75 टक्के लोक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले आहेत. त्यांनी काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली आहे. हा मूळ विचार नाहीय. 2024च्या आधी त्यांचं अर्ध दुकान खाली होणार आहे. हाफ चड्डी घालणारे फुल पँट शिवायला टाकणार आहेत, अशी मिश्कील टिप्पणी राऊत यांनी करताच एकच हशा उसळला.
आता जे सरकार स्थापन झालं आहे, ती एकेकाळी शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती. आता जे कुणी गैरसमज निर्माण करत आहेत, त्यांना शिवसेनेचा विचार आणि शिवसेनाप्रमुख यांची भूमिका माहिती नाही. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे, असा टोलाही खासदार राऊत यांनी लगावला.

































































