#TokyoOlympics2021 – ऑटो रिक्षा चालकाची कन्या दीपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा

वडील ऑटो रिक्षा चालक अन् आई नर्स… घरची परिस्थिती हलाखीची अन् लहानपणीच तिरंदाजी अॅकॅडमीमधून मिळालेला नकार अशा विपरीत परिस्थितीवर लीलया मात करीत हिंदुस्थानातील 27 वर्षीय महिलेने जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानावर झेप घेतली आणि आता या खेळाडूंकडून हिंदुस्थानला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याची आशा आहे. या तिरंदाजाचे नाव आहे दीपिका कुमारी. रांची येथील छोटय़ाशा खेडेगावात राहणाऱया दीपिका कुमारीने आतापर्यंत तिरंदाजीत केलेली कामगिरी काबील-ए-तारीफच ठरलीय.

अर्जुन मुंडा ते टाटा अॅकॅडमीपर्यंतचा प्रवास

दीपिका कुमारीने 2007 साली जबलपूर येथे झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले. तिला यात अपयश आले. पण त्यानंतर विजयवाडा येथे झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावले. यानंतर तिने मागे वळून बघितले नाही. अर्जुन मुंडा अॅपॅडमीमधून सुरू झालेला प्रवास आता जमशेदपूर येथील टाटा तिरंदाजी अॅकॅडमीपर्यंत येऊन पोहचलाय. टाटा अॅपॅडमीचे प्रमुख मुकूल चौधरी या वेळी म्हणाले, तिरंदाजीत आमच्या अॅकॅडमीला पदक जिंकता आलेले नाही. दीपिका कुमारीकडून आम्हाला टोकियोमध्ये पदकाची अपेक्षा आहे.

मेहनतीच्या जोरावर प्रगती

आई-वडिलांनी दीपिका कुमारीला अर्जुन मुंडा यांच्या अॅकॅडमीत नेले. पण ट्रायलमध्ये तिला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर दीपिका कुमारीने आणखी एक संधी मिळावी यासाठी विनंती केली. अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा यांनीही तेथील प्रशिक्षकांना तिच्या समावेशाबाबत आग्रह धरला. यानंतर अॅकॅडमीचे प्रशिक्षक बी श्रीनिवास राव व हिमांशू मोहंती यांनी तीन महिन्यांमध्ये स्वतŠला सिद्ध करण्याचे वचन दीपिका कुमारीकडून घेतले. या कालावधीत तिने मेहनतीच्या जोरावर सर्वांनाच सुखद धक्का दिला. तिच्या डोळ्यांत दृढसंकल्प दिसून येत होता. ती कोणताही सराव दोन वेळा करायची.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी

  • जागतिक चॅम्पियनशिप – दोन रौप्य
  • आशियाई चॅम्पियनशिप – एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कास्य
  • वर्ल्ड कप – एक सुवर्ण
  • कॉमनवेल्थ गेम्स – दोन सुवर्ण
  • आशियाई गेम्स – एक कास्य

बहिणीमुळे तिरंदाजीकडे ओढा

दीपिका कुमारीची पावले तिरंदाजी या खेळाकडे 2006 साली वळली. बहीण दीप्ती कुमारी हिच्या लोहरदगा येथील घरात राहायला गेली असताना दीपिका कुमारीला तिरंदाजीचे आकर्षण वाटू लागले. आपल्या बहिणीप्रमाणेच आपणही हा खेळ खेळावा असा विचार तिच्या मनात आला. तसेच दीपिका कुमारीला आपल्या कुटुंबालाही आर्थिक हातभार लावायचा होता. यासाठी तिने तिरंदाजीकडे आपला मोर्चा वळवला.

आपली प्रतिक्रिया द्या