मीराबाई चानूचं रौप्यपदक होणार सोनेरी? सुवर्ण पदक विजेत्या चीनची खेळाडू होऊ जिहुईची होणार डोपिंग टेस्ट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी रौप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणारी हिंदुस्थानची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सुवर्ण पदकविजेती चीनची होऊ जिहुई हीची डोपिंग टेस्ट होणार असल्याचे ट्विट अमेरिकेतील काईल बेस नावाच्या व्यक्तीने केले आहे. त्याच्या या ट्विटने क्रीडा जगतात एकच खळबळ उडाली आहे.

मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करीत देशाच्या पदकाचे खाते उघडून देशवासीयांना जल्लोषाची संधी दिली. मात्र तिच्या पदकाचा रंग बदलल्यास देशवासीयांचा हा आनंद आणखी द्विगुणीत होणार आहे. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो गटातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूची डोपिंग टेस्ट होणार असल्याचे ट्विट अमेरिकेतील काईल बेसने केले आहे. या चिनी खेळाडूने प्रतिबंधक पदार्थ सेवन केल्यामुळे तिचे पदक रद्द होऊ शकते. याचा फायदा हिंदुस्थानच्या मीराबाई चानूला होऊ शकतो, अशी चर्चा आता रंगली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅण्टी डोपिंग एजन्सीच्या अधिकाऱयांनी चीनची वेटलिफ्टर होऊ जिहुई हिला दुसऱया डोप टेस्टसाठी टोकियोमध्येच थांबण्याची सूचना दिली आहे. होऊ जिहुई जर दुसऱया डोपिंग टेस्टमध्येही पॉझिटिव्ह आली तर तिचे सुवर्ण पदक काढून घेतले जाईल व ते रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूला मिळेल. याचबरोबर कास्य पदक विजेती वेटलिफ्टर रौप्य पदकाची मानकरी ठरेल, तर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या खेळाडूचा कास्य पदकाने गौरव होईल.

देशवासीयांच्या अपेक्षांचे ओझे घेऊनच टोकियो ऑलिम्पिकसाठी गेले होते. मात्र कुठलेही दडपण न घेता मी मनाप्रमाणे कामगिरी केली अन् रौप्य पदक जिंकले. 2016च्या रियो ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिल्यानंतर मी निराश झाले होते. मात्र हिम्मत न हारता कठोर मेहनत केली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे कडवे आव्हान होते. पाच वर्षांची साधना फळाला आल्याने सहाजिकच खूप आनंद झालाय.’’ – मीराबाई चानू

मीराबाईचं मायदेशात जंगी स्वागत

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवून मायदेशी परतलेल्या मीराबाई चानूचे मायदेशात दिल्ली विमानतळावर आगमन होताच, जंगी स्वागत झाले. विमानतळावरील कर्मचाऱयांनीही ‘भारत माता की जय’च्या घोषणा देऊन ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाईला मानवंदना दिली. विमानतळावरच मीराबाई आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांची आरटी-पीसीआर टेस्टही करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या