कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना टोलमाफी; एकनाथ शिंदे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. टोलमाफीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सवात कोकणात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसीव्दारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.