टोमॅटो घसरला, किलोचा भाव अवघा दीड रुपया

20

सामना प्रतिनिधी । नाशिक

हंगाम सुरू होऊन दोन आठवडे होत नाही तोच लासलगावला टोमॅटोचा कमाल भाव 20 वरून साडेपाच रुपये प्रतिकिलोवर घसरला आहे. येथे किमान भाव दीड रुपये किलो होता. दरात 75 टक्क्यांपर्यंत घट झाल्याने नाशिक जिह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, इजिप्तमध्ये निर्यात सुरू झाल्यानंतर भाव वधारतील, अशी आशा आहे.

ऑगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात म्हणजे 15 ऑगस्टपासून लासलगाव, पिंपळगाव, येवला, देवळा, मनमाड बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक सुरू झाली. सप्टेंबरमध्ये खऱ्या अर्थाने आवक वाढेल. हा हंगाम नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. पंधरा ऑगस्ट रोजी लासलगावला कमाल 20, सरासरी 12.50, किमान 4 रुपये किलो दर होता. आज येथे कमाल 5.50, सरासरी 4, किमान दीड रुपया किलो दर मिळाले. आवक 2400 क्विंटल होती. पिंपळगावला कमाल भाव 10, सरासरी 8, किमान 3 रुपये असा दर स्थिर आहे. येथे आज 13 हजार 641 क्विंटल आवक होती. नाशिकला 570 क्विंटल आवक होती. कमाल भावात 15 वरून 6.45, सरासरी 8 वरून 5, किमान 5 वरून 3 अशी घसरण झाली. येवला, मनमाड, देवळा येथे अद्यापही फारशी आवक वाढलेली नाही.

इतर बाजार समित्यांमधील आजचे दर कमाल, सरासरी, किमान व कंसात आवक क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे – येवला- 5-3.5-2 (1000), देवळा- 6.25-3.75-2.5 (300), मनमाड- 5.55-4.25-3.50 (166).

मागणी अत्यल्प
पावसामुळे टोमॅटो लवकर खराब होत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मागणीही अत्यल्प आहे. पावसामुळे फारशी वाहतूक होत नसल्याने भावात घसरण झाली आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, इजिप्तला निर्यात सुरू झालेली नाही. निर्यात सुरू झाल्यानंतर भाव वधारतील.

आपली प्रतिक्रिया द्या