टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरची महाग; पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी

Photo Courtesy- Canva.com

राज्यभरात सुरू असलेल्या सलग पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर, सिमला मिरचीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि. २५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १४-१५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, इंदोर येथून गजर ३ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून १ टेम्पो भुईमुग शेंग, हिमाचल प्रदेश ३ ते ४ टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा १ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी ३ ते ४ रेम्पो मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ३०० ते ४०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ४०० ते ४५००, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७-८ टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७-८ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, भुईमुंग शेंग ४० ते ५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ५० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात वाढ
मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि.२५) कोथिंबिरीची सुमारे ९० हजार जुडी तर मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली होती. पावसामुळे आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.