
>> राजेश चुरी
आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याने राज्यात पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहे. सुमारे दीड कोटी लोक अवलंबून असलेल्या पर्यटन व्यवसायात या आर्थिक वर्षात अडीच लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. आता उद्योगाचा दर्जा मिळाल्याने 2030 वर्षापर्यंत या व्यवसायात तब्बल 10 लाख कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल अपेक्षित असल्याची माहिती पर्यटन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला कसा फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
अडीच लाख कोटींवरून 10 लाख कोटी उलाढाल
या निर्णयाने पायाभूत सुविधांचा विकास होईल गुंतवणूक वाढेल. अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. परिणामी 2030पर्यंत 10 लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.
नवी पर्यटन धोरणे
पर्यटन विभागाच्या नवीन योजनांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, पर्यटन विभागाने परवाना सुलभता धोरण, कृषी पर्यटन, बीच शॅक धोरण जाहीर केले आहे. कॅराव्हॅन पर्यटन, साहसी पर्यटन धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यात मेडिकल टूरिझम धोरण राबवण्याचा विचार आहे. या धोरणाअंतर्गत विविध पर्यटन व्यावसायिकांना सवलत मिळतील. त्यातून रोजगार वाढेल. अनेक खासगी गुंतवणूकदारांबरोबर सामंजस्य करार करण्यात येत आहे. लाईव्ह शूटींग, पॅरामोटरिंग, डिजिटल मार्केटिंगवर भर देण्यात येईल.
दीड कोटी लोक अवलंबून
या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाल्याने पर्यटन प्रकल्प, हॉटेल, रिसॉर्टना वीज, बील, मालमत्ता कर, बिनशेती कर, पाणीपट्टीवर वाणिज्यिक दरांऐवजी औद्योगिक दराने आकारणी होणार असल्याने भांडवली खर्चात कपात होईल. पर्यायाने हॉटेलचे दर कमी होऊन पर्यटकांना स्वस्त दरात हॉटेल उपलब्ध होतील. यामुळे पर्यटन व्यावसायिकांना नफा होईल. राज्यात हॉटेल, रिसॉर्टची संख्या वाढेल, गुंतवणूक वाढेल व रोजगार निर्मिती होईल. पर्यटन व्यवसायावर राज्यात 40 लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होते तर त्यावर सुमारे दीड कोटी लोक अवलंबून आहेत असे अदिती तटकरे म्हणाल्या.
राज्यात पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. पर्यटनाच्या बाबतीच अजूनही परिणामकारक मार्केटिंग झालेले दिसत नाही. ते प्रभावी करण्याची गरज आहे. पर्यटनस्थळांजवळ स्थानिकांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. राज्यात इगतपुरी, लोणार, जव्हार, खोडाळ, माचाळ तसेच किल्ल्यांच्या विकासावर भर दिला जाईल.
– अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री





























































