शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेनेचा आज ‘ट्रॅक्टर’ मोर्चा, उद्या ‘चक्का जाम’

शेतकऱयांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने आज मराठवाडय़ात तालुकानिहाय ट्रक्टर मोर्चे काढले जाणार आहेत. त्यानंतर 12 जूनला जिल्हानिहाय चक्का जाम करून महायुती सरकारला जाब विचारला जाणार आहे. शेतकऱयांची कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 45 हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकऱयांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदान परतावा आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेले सरकार आता सगळे विसरले आहे. म्हणूनच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या या तिहेरी सरकारला ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा जाब या आंदोलनांद्वारे विचारला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.