आज्जीच्या मायेची उब देणारी राजवाडी गोधडी ! थंडीच्या दिवसात मागणी वाढली

गोधडीचं नांव निघताच आठवण होते, ती घरातील प्रेमळ आजीसह आज्जीच्या सूती साडीची. आपल्या नातवंडाना प्रेमाने कुशीत घेऊन गोष्ट सांगणारी घराघरातील आजी नातवंड झोपी जाताच त्यांच्या अंगावर स्वतःच्या सूती साडीची मोठया मेहनतीने स्वतःच तयार केलेली गोधडी पांघरून मायेची उब देत होती. बदलत्या काळात कुटुंब मर्यादित झालं, आजी आणि नातवंडांची ताटातूट झाल्याने नातवंडांना आजीच्या मायेची उब देणारी गोधडी पारखी झाली. यावर उपाय म्हणून लोक सक्षमिकरण चळवळ संस्थेच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील राजावाडी या गावातील महिलांनी ” राजवाडी गोधडी ” बाजारात आणली असून या गोधडीला मोठी मागणी होत आहे.

जुन्या साड्या-लुगडी, चादरी किंवा अन्य कपड्यांचा वापर करून घरातल्या महिलांनी शिवलेल्या गोधड्या एके काळी थंडीच्या दिवसांत घरोघरी जणू मायेची उब देत असत. पण सध्याच्या यांत्रिक युगात अशी गोधडी नजरेला पडणंसुद्धा मुश्किल झालं आहे. राजवाडीतल्या काही महिलांनी मात्र ही कला केवळ जोपासलेली नाही, तर तिला आधुनिक रूप देत व्यावसायिक पातळीवरही यश मिळवलं आहे. नव्या कोऱ्या शंभर टक्के सुती कापडाचं सुंदर नक्षीकाम केलेलं आवरण, मांजरपाटाचं अस्तर आणि या दोन्हींच्या आतमध्ये वापरलेल्या उबदार कापडामुळे ही गोधडी वजनाला हलकी, उबदार, पण धुलाई यंत्रामध्येसुद्धा धुणं शक्य झालं आहे.‌

सात फूट बाय चार फूट लांबी-रुंदीची ‘राजवाडी गोधडी’ पारंपरिक पद्धतीने हाताने टाके घालून शिवली जाते. यामध्ये कष्टांबरोबर कौशल्यही आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ही गोधडी राज्यातल्या महानगरांप्रमाणेच परदेशातही अनोखी भेटवस्तू म्हणून पोहोचली आहे.

गोधडी शिवणं ही एक कला आहे. यामध्ये एकाच जागेवर बसून हाती टाके घालायचे काम करावे लागते. गोधडी जेवढी रंगीत कापडाच्या तुकड्यांची असेल तेवढं टाके घालायचं काम वाढतं. एक गोधडी पूर्ण शिवायला साधारण दोन दिवसांचा कालावधी लागतो. या व्यवसायासाठी आम्हाला लोक सक्षमिकरण संस्थेचे सतीश कामत यांच मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे.
संध्या पांचाळ ( गोधडी कारागीर )