गडहिंग्लज शहरातील वाहतुकीचे तीनतेरा; महामार्गाचे काम गतीने होईना, वाहतुकीची समस्या काही सुटेना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातून सध्या संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. रस्ताखोदाईमुळे वाहतुकीची होत असलेली प्रचंड कोंडी यामुळे नागरिकांसह वाहनधारक, व्यापारी त्रस्त झाले आहेत. पर्यायी मार्गदेखील अरुंद असल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. ‘तहान लागल्यावरच विहीर खोदण्याचा प्रकार’ या वाहतूक नियोजनाबाबत झाल्याने आता वाहतुकीची ही समस्या मोठी डोकेदुखी बनली आहे. ‘महामार्गाचे काम काय गतीने होत नाही, वाहतुकीची समस्या काय सुटत नाही!’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

संकेश्वरपासून सिंधुदुर्ग जिह्यातील बांद्यापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग जोडला जाणार आहे. गडहिंग्लज हद्दीतील कामाचा विचार करता, शेरी नाला ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंत काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रस्ताखोदाईमुळे व्यापाराला फटका बसू शकतो, याकडे व्यापाऱयांनी अधिकाऱयांचे लक्ष वेधत शहरातील काम दिवाळीनंतर हाती घ्यावे, असे त्यावेळी सुचविले होते. त्यामुळे पेट्रोल पंपापुढील शहरातील महामार्गाचे काम दिवाळी संपल्यानंतर सुरू करण्यात आले आहे. शहरातून रस्ताखोदाईचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते, याकडेदेखील व्यापाऱयांसह नागरिकांनी महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका प्रशासन यांचे लक्ष वेधलेय. तसेच वाहतुकीच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. शहरातील कामे हाती घेण्यापूर्वी पर्यायी मार्ग शोधून वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहरातील रस्त्यांची खोदाई सुरू झाल्यानंतर संकेश्वर मार्गावरील वाहतुकीवर मोठा ताण पडला.

म. दु. श्रेष्ठा विद्यालयापासून वीरशैव चौकापर्यंत रस्त्याची खोदाई करण्यात आली व येथूनच वाहतुकीची खरी समस्या निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक चिंचोळ्या रस्त्यामुळे तुंबू लागली. त्यातच ऊसवाहतूक व अवजड वाहनांमुळे यात मोठी भरच पडू लागली. त्यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी वाहतूककोंडीमुळे संतप्त नागरिकांनी येथील वाहतूक रात्री बंद पाडत ठेकेदार कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱयांना धारेवर धरले होते. रिलायन्स पेट्रोल पंप ते वीरशैव बँकेपर्यंत खोदलेल्या रस्त्याचे काम बाकी असताना त्यापुढे पुन्हा कडगाव रोडच्या कोपऱयापर्यंत रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. मुळातच काम संथ गतीने सुरू आहे आणि त्यात नव्याने होत असलेली खोदाई यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. सध्या शहरात अजून रिंग रोड अस्तित्वात नसल्याने शहराबाहेरून वाहतूक काढणे मुश्किलीचे होत आहे.

या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून गेल्या आठवडय़ात संकेश्वर मार्गावरील वाहतूक एकेरी केली आहे, तर गडहिंग्लजकडून संकेश्वरकडे जाणारी वाहतूक पूर्ववतच ठेवली आहे. या वाहतुकीमुळे बऱयाचदा वादावादीचे प्रसंगही निर्माण होत आहेत. सध्या उपलब्ध पर्यायी मार्गही अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. सध्या शहरात खोदाई केलेल्या रस्त्यांचे काम ठेकेदाराकडून गतीने पूर्ण करून घेता येईल, याकडे पालिकेनेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

शिवसेनेचा ठेकेदार, अधिकाऱयांना अल्टिमेटम

20 दिवस उलटले तरी शहरातील म. दु. श्रेष्ठा विद्यालयापासून ते मुसळे तिकटीपर्यंतच्या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक बनला आहे. काळभैरव यात्रेपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करावे; अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख संदीप कुराडे यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, ठेकेदार यांना अल्टिमेटम दिला आहे.