
सामना ऑनलाईन, मुंबई
नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी ठिकठिकाणी डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, चौपाटय़ा, गेटवे ऑफ इंडियावर झालेली गर्दी असा माहोल आज सोमवारी मुंबईत जिकडेतिकडे होता. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांनी जागोजागी अशी टाइट फिल्डिंग ठेवली होती.
कुणी दारू पिऊन वाहन चालवू नये यासाठी वाहतूक पोलीस वाहनचालकांची चाचणी घेत होते. वाहनचालकांना उपकरणामध्ये फुंकर घालायला सांगून त्यांची चाचणी घेण्यात येत होती. वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईत सगळीकडे वाहतूक संथगतीने सुरू होती, परंतु नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी लावलेल्या टाइट फिल्डिंगला वाहनचालक सहकार्य करत होते.



























































