
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत, असा व्हॉट्सअॅप ध्वनिफीत संदेश, छायाचित्र व टेक्स्ट मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीचा कॉल करणाऱयाला पोलिसांनी शोधून काढले असून तो मूळ बंगालचा आहे. त्याचे मानसिक संतुलन ढासळलेले असल्याचे समजते.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला त्यांच्या हेल्पलाइनवर व्हॉट्सअॅप ध्वनिफीत, छायाचित्र व टेक्स्ट मेसेज आले. त्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार असल्याचे म्हटले होते. तसेच त्याने इतर काही व्हॉट्सअॅप ध्वनिफीत पाठवून संदेशात नवाज नावाच्या व्यक्तीचे नाव, स्वतःचे आधारकार्डशिवाय अन्य व्यक्तींचे फोटो पाठवले. ध्वनिफीत हिंदी भाषेत असून त्याचा बोलण्याचा टोन बंगाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो नंबर बंद लागत होता. पोलिसांनी तांत्रिक बाबीच्या माध्यमातून माहिती काढली असता सदर संदेश पाठवणारा व्यक्ती केरळ येथील नवास अबुबकर यांच्या बिष्मा डायमंड पंपनीत काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.


























































