
सामना ऑनलाईन । मुंबई
रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर दर रविवारचा दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात येत असलेला मेगाब्लॉक रद्द केल्याने खुशीने घराबाहेर पडलेल्या भावा-बहिणींचा आज लोकलमधील तुफान गर्दीने चांगलाच हिरमोड झाला. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेरसह बेस्टच्या बसेसनाही प्रचंड गर्दी. त्यात रस्त्यात मेट्रोच्या कामामुळे झालेल्या कोंडीची भर पडल्याने कुटुंबकबिल्यासह घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचा दिवस कमालीचा त्रासदायक ठरला.
रविवारच्या दिवशी रक्षाबंधन आल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील दुरुस्तीसाठीचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला होता, परंतु याचा आनंद फार काळ मुंबईकराच्या चेहर्यावर राहिला नाही. रविवार सकाळपासूनच लोकलमध्ये शिरण्यासाठी कसरत करावी लागली. बेस्टच्या बसेसनाही प्रचंड गर्दी होती. त्यामुळे मुंबईकर मिळेल त्या वाहनांनी उपनगरांकडे जात होते. पश्चिम उपनगराकडे जाणार्या बसेसना ट्रफिक जामचा सामना करावा लागला. पश्चिम उपनगरात जागोजागी मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रक्षाबंधनाच्या मराठीबहुल भागातील स्थानकांत सकाळपासून रेल्वेच्या तिकीट खिडक्यांना प्रचंड गर्दी असते. या दिवशी डोंबिवली, कल्याण, बदलापूर येथील प्रवासी दक्षिण मुंबईत तर दक्षिण मुंबईतील प्रवासी पूर्व आणि पश्चिम उपनगरात सणासाठी आपापल्या कुटुंबीयांकडे येत-जात असतात. या दिवशी मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या भागात ये-जा करणार्यांची संख्या प्रचंड असते. रक्षाबंधनासाठी सकाळपासून निघालेल्यांना रस्त्याप्रमाणेच लोकलमधील गर्दीचा सामना करावा लागला. महामार्गांप्रमाणेच छोटेमोठे रस्तेही वाहतूककोंडीत अडकले होते. मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागला. त्यामुळे डोंबिवली, ठाणे, दादर, विलेपार्ले स्थानकांत प्रचंड गर्दीचा अनुभव आला. वाशी, बेलापूर, ऐरोलीसह पश्चिम रेल्वेवरही स्थानक, लोकलमध्ये गर्दी होती. केवळ रविवारच नव्हे तर शनिवारीदेखील मुंबईत वाहतूककोंडी झाली होती.




























































