कोरोनाविरोधात शिक्षक बनणार विद्यार्थ्यांची ढाल; 150 पालिका शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक प्रशिक्षण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, काही महिन्यांनंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या तर विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांनी काय खबरदारी व्हावी यासाठी पालिकेकडून 150 शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. शीव रुग्णालयात नुकतीच पालिकेने या उपक्रमाला सुरुवात केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईत विद्यार्थी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र काही महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्या तर मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये आणि ते कोरोनापासून सुरक्षित राहावेत तसेच शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या स्तरावर घ्यायची खबरदारी यासाठी महापालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाद्वारे 150 शिक्षकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक विशेष प्रशिक्षणाला नुकतीच सुरुवात झाली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सीमा बनसोडे-गोखे तसेच शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यक्रम

प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे यासाठी 120 व्यक्तींची क्षमता असणाऱ्या सभागृहात दररोज केवळ 30 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने सुरक्षित शाळा, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, शिक्षकांनी घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांना वेळोवेळी करावयाचे मार्गदर्शन या बाबींचा समावेश आहे.

सलग 5 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात 150 शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विशेष प्रशिक्षण घेतलेले हे शिक्षक त्यांच्या शाळांमधील इतर शिक्षकांना आणि जवळपासच्या परिसरातील मनपा शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

प्रशिक्षणानंतर याच पद्धतीने खासगी-प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षणाधिकाऱयांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या