
पोलीस दलात आज मोठे फेरबदल करण्यात आले असून पोलीस महासंचालकपदावर असलेले हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त झाले आहेत. परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तदावरून बदली करतानाच त्यांच्याकडे होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस दलातील बदल्यांची घोषणा आज सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करतानाच रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांचा 19 महिन्यांचा सेवा कालावधी शिल्लक आहे. नगराळे यांच्याकडे 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे सध्या पोलीस महासंचालक विधि व तंत्रज्ञान या पदावर कार्यरत होते.





























































