नवी मुंबई -17 अधिकाऱ्यांसह 33 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागात काम करणाऱ्या 17 अधिकारी आणि 16 कर्मचाऱ्यांच्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आज बदल्या केल्या. हे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या 7 ते 14 वर्षांपासून या विभागात काम करीत होते. आयुक्तांनी आरोग्य विभागापाठोपाठ एलबीटी विभागालाही दणका दिल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय नियमानुसार एका अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला एका विभागात तीन वर्षे काम करता येते. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या एलबीटी विभागात काही अधिकारी गेल्या 14 वर्षांपासून काम करीत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर या विभागातील 33 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी आज बदल्या केल्या. या बदल्या करताना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा निकष लावण्यात आला आहे. एलबीटीप्रमाणे आरोग्य विभागातही अनेक अधिकारी वर्षानुवर्षे काम करत होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी आरोग्य विभागातही मोठय़ा प्रमाणात बदल्या केल्या. त्यापाठोपाठ एलबीटी विभागात झालेल्या या बदल्यांमुळे एकाच पदावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.