बिबट्याची पिंजऱ्याला हुलकावणी; कोल्हार येथील शेतकऱ्यांची चिंता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हार आणि भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करणे कठीण झाले आहे. पिंजऱ्यात बिबट्याचे भक्ष्य ठेऊनही बिबटे पिंजऱ्याला हुलकावणी देत आहेत. प्रवरा पट्ट्यात नगर जिल्ह्यात बहुसंख्येने साखर कारखानदारी आहे. बिबट्यांना येथे मुबलक पाणी, लपण्यासाठी ऊसाचा आडोसा व शेतकऱ्यांचे पशुधन मिळत असल्याने बिबट्यांचा वावर उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांची संख्या वाढत असल्याने या भागात दहशतीचे वातावरण आहे.

बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडे केवळ एकच उपाय आहे. पिंजऱ्यात भक्ष्य ठेवून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा करण्यात येते. मात्र, आता परिसरातील बिबटे वनखात्याने पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्षाला बळी पडत नसल्याने बिबटे जेरबंद होण्याचे प्रमाण घटले आहे. भगवतीपूर येथील थडी फाटा परिसरात बिरोबा मंदिराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात अनेक महिन्यांपासून येथे वावर असलेल्या तीन बिबट्यांपैकी एकही बिबट्या जेरबंद होत नाही. त्यामुळे आता वनखात्याने येथील पिंजराच अन्यत्र हलविला आहे. येथे रोजच पशुधन व कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वनखात्याने परिसरातील बिबटे तातडीने जेरबंद करावेत, अशी मागणी कोल्हार आणि भगवतीपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

एकाच वेळी तीन बिबट्यांचे ग्रामस्थांना दर्शन झाल्याने दहशतीमुळे सायंकाळी सातनंतर शेतकरी बाहेर पडत नाहीत. त्यात रात्री 11 नंतर वीज येते.दिवसभर वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. महावितरण दिवसा वीज देत नाही आणि बिबट्या रात्री शेतीला पाणी देऊ देत नाही, अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, असे भगवतीपूरचे माजी उपसरपंच बी. के. खर्डे यांनी सांगितले. पिंजऱ्याभोवती बिबट्या घिरट्या घालतो आणि निघून जातो. त्यात वनखाते पिंजरा उचलून घेऊन गेलेत. पिंजऱ्यामुळे बिबट्या जेरबंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता पिंजराच नसल्याने शेतीची कामे करणे अवघड झाले आहे. वनखात्याच्या दुर्लक्षाने बिबट्याची दहशत परिसरात वाढतच चालली आहे, असे प्रकाश डी खर्डे या शेतकऱ्याने सांगितले.