
परदेशात जाण्यासाठी तिकीट व व्हिसा काढून देतो अशी बतावणी करून पैसे घेतले; परंतु मोबदल्यात बनावट तिकीट देऊन प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या तरुणाची दहा लाखांची फसवणूक करणाऱ्या एका भामटय़ाला नेहरू नगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे समजते.
स्वप्नील काळे हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे काम करतात. कामानिमित्त त्यांना परदेशात जावे लागते. 2016मध्ये अमेरिकेला जाण्यासाठी स्वप्नील यांना ट्रॅव्हल एजंट असलेल्या धीरज मुलचंदानी याने तिकीट व व्हिसा काढून दिला होता. त्यानंतर स्वप्नील यांना कुटुंबासह पुन्हा परदेशात जायचे होते. त्या वेळी धीरजने स्वस्तात तिकिटे व व्हिसा काढून देतो असे सांगितले. धीरज याने पूर्वी अमेरिकेला जाण्यासाठी तिकीट व व्हिसा काढून दिला होता. त्यामुळे स्वप्नील यांनी विश्वास ठेवून धीरज यांना फॅमिली टूरसाठी तिकिटे व व्हिसासाठी पाच लाख रुपये दिले, परंतु या वेळी धीरजने झोल केला. त्याने स्वप्नील यांना विमानाची बनावट तिकिटे दिली. अशा प्रकारे तीन ते चार वेळा धीरजने स्वप्नील यांना विमानाची बनावट तिकिटे दिली. धीरजने दहा लाख घेतले, पण तिकिटे काढून दिली नाहीत. शिवाय पैसे परत न करता फसवणूक केली. तसेच स्वप्नील यांच्या काही मित्रांचीदेखील अशीच फसवणूक केली. त्यामुळे स्वप्नील यांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी केल्यानंतर अखेर धीरजला पकडले.




























































