‘वृक्ष नगरी’ मुंबईचा जागतिक स्तरावर गौरव, आदित्य ठाकरे यांच्याकडून उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरणाचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण संतुलनासाठी अनेक उपक्रम राबविणाऱया मुंबईची जागतिक स्तरावर ‘वृक्ष नगरी’ म्हणून निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने 2021 वर्षासाठी ‘वृक्ष नगरी’ (Tree City) म्हणून मुंबईचा गौरव केला आहे. पालिकेच्या या गौरवाबद्दल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

‘वृक्ष नगरी’ असा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे. पालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीत आदित्य ठाकरे यांनी  आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील ‘अरबोर डे फाऊंडेशन’ यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली. मुंबई शहराच्या या बहुमानाबद्दल अधिक माहिती देताना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, पालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्र्ाशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी देशात केवळ हैदराबाद या एकाच शहराला हा बहुमान लाभला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी, सहआयुक्त अजित पुंभार, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त मिलिन सावंत, उपायुक्त संजोग कबरे,  अजय राठोर यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ‘अरबर डे फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन केले आहे.