
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
मुसळधार पावसामुळे चिरनेरच्या बापूजी देव मंदिरावर एक भलेमोठे झाड पडल्याने मंदिराच्या सभामंडपाची मोठी हानी झाली आहे. शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे हे झाड उन्मळून या मंदिराच्या सभामंडपावर पडले. यामुळे मंदिराच्या सभामंडपाचे पत्रे फुटले आहेत. सुदैवाने हे झाड मंदिराच्या गाभाऱ्यावर पडले नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
चिरनेरच्या ग्रामस्थांचे बापूजीदेव हे श्रद्धास्थान आहे. गावाच्या बाहेर हे मंदिर आहे. अतिशय पुरातन काळापासून हे मंदिर असून नवसाला पावणारा व गावाचे रक्षण करणारा देव म्हणून गावकऱ्यांची बापूजी देवावर श्रद्धा आहे. दरवर्षी गावदेवी यात्रे निमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान, मंदिरावर झाड पडल्याचे गावकऱ्यांना समजल्यानंतर चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, पंचायत समिती सदस्या शुभांगी पाटील, सुरेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मंदिराला भेट दिली. लवकरात लवकर या सभामंडपाचे काम केले जाईल असे यावेळी सरपंच संतोष चिर्लेकर यांनी सांगितले.




























































