वेधक – रत्नागिरीचा विकिपीडिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दत्तात्रय ऊर्फ राजन गोगटे

>> दुर्गेश आखाडे

देश-विदेशातील अनेक नामवंत मंडळींची माहिती आपल्याला विकिपीडियावर मिळते. कोकणही अशीच नररत्नांची खाण आहे.विविध क्षेत्रांत कर्तबगारी गाजवलेली अनेक नामवंत मंडळी आहेत.अशा मंडळींची दुर्मिळ माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम रत्नागिरीतील राजन गोगटे करत आहेत. राजन गोगटे म्हणजे ‘रत्नागिरीचा विकिपीडिया’ आहे. दत्तात्रय ऊर्फ राजन गोगटे यांनी ‘रत्नागिरी मीडिया’ नावाचे फेसबुक पेज आणि व्हॉटस्अॅप ग्रुप सुरू करून ते दररोज त्या दिवसाचे दिनविशेष, त्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि ज्या प्रसिद्ध व्यक्तींचे जन्मदिन किंवा स्मृतिदिन आहेत अशा व्यक्तींची माहिती छायाचित्रासह देतात. गेली पाच वर्षे अखंडित आणि विनामोबदला ही सेवा ते वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि वाचकांमध्ये ‘रत्नागिरी मीडिया’ लोकप्रिय झाला आहे. वय वर्षे 63 असलेल्या या तरूणाने माहिती संकलनाचा छंद जोपासताना त्याला आधुनिकतेची म्हणजे सोशल मीडियाची जोड दिली आहे ही गोष्ट  तरुणाईसाठी आदर्शवत आहे.

कोरोनाच्या काळात काही मंडळींना नवीन संकल्पना सुचल्या. त्यापैकी दत्तात्रय ऊर्फ राजन गोगटे यांची माहिती संकलनाची नवी संकल्पना होती. सुरुवातीला त्यांनी रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील कर्तबगार मंडळींशी संपर्क साधून त्यांची माहिती गोळा केली आणि 18 ऑगस्ट 2020 या मातृदिनापासून त्यांनी ही संकल्पना सुरू केली. दिनविशेष आणि व्यक्ती विशेष देत असताना गोगटे यांनी 1 जून 2021 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडी वेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली. ज्या दिवशी जिल्ह्यातील कर्तबगार व्यक्तीचा जन्मदिन आहे त्याची सर्व माहिती ते छायाचित्रासह ‘रत्नागिरी मीडिया’ या फेसबुक पेज आणि व्हॉटस्अॅप ग्रुपवर देत असल्याने अनेक अप्रकाशित व्यक्तींच्या कर्तृत्वाला उजाळा मिळाला. तसेच नव्या पिढीला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींची माहिती मिळून त्या व्यक्ती त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत बनल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातून सुरू झालेल्या राजन गोगटे यांच्या या मोहिमेने कोकण पादाक्रांत केला आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील व्यक्ती विशेष आणि घडामोडींवर ते प्रकाशझोत टाकतात. या सर्व कामांत त्यांना त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचे सहकार्य लाभले आहेत. केवळ एक छंद म्हणून त्यांनी जोपासलेली कला ही कोकणची लायब्ररीच  बनत आहे.