‘पंतप्रधान मोदींनी मला फोन केला, पण…’, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपानंतर भाजप आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी देशातील काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला आणि राज्याची कोरोना परिस्थिती जाणून घेतली. यात झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांचाही समावेश होता. मोदींनी आपल्याची फोनवरून संवाद साधल्याची माहिती हेमंत सोरेन यांनी ट्विट करून दिली. मात्र यासोबत त्यांनी पंतप्रधानांवर लावलेल्या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘मन की बात’ करत असून ‘काम की बात’ करत नसल्याचे म्हटले. ‘आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला. त्यांनी फक्त ‘मन की बात’ केली. त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाची गोष्ट ऐकली असती तर चांगले झाले असते’, असे ट्वीट सोरेन यांनी केले.

सोरेन यांच्या ट्विटनंतर भाजपचे नेते आणि मंत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आसाम सरकारचे मंत्री हिमंत बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी सोरेन यांच्या आरोपांना उत्तर दिले. ‘जनतेच्या त्रासाबाबज जाणून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फोन केला होता. याची तुम्ही मजा उडवत आहात. खूपच तुच्छ वर्तन केले आपण. मुख्यमंत्रीपदाचा मान राखला नाही’, असे ट्वीट हिमंत बिस्व सरमा यांनी केले.

हिमंत बिस्व सरमा यांच्यासर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफी रियो यांनीही सोरेन यांच्यावर हल्लाबोल केला. ‘महामारीच्या या कठीण काळात राजकारण करू नका’, असे किरण रिजिजू म्हणाले तर ‘पंतप्रधान मोदी राज्यांप्रती संवेदनशील असून सोरेन यांचे विधान चुकीचे आहे’, असे नेफी रियो यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे सोरेन पहिले मुख्यमंत्री नाहीत. याआधी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधानांसोबत होणाऱ्या चर्चांवर सवाल उपस्थित केले होते. पंतप्रधानांसोबतची चर्चा ‘वन वे’ असते, कोणतेही उत्तर मिळत नाही, असा आरोप बघेल यांनी केला होता.