खासगी क्लासच्या शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम लकी रायला पोक्सो

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लकी राय उर्फ पुणेनद्रु राय (50) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे या नराधमाने विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देत अनेक वेळा अत्याचार केला. अखेर शिक्षकाच्या जाचाला कंटाळून पीडितेने आईवडिलांना घडलेली घटना सांगितली आणि याचा उलगडा झाला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित विद्यार्थिनी ही एफवायबीएमध्ये शिक्षण घेत असून तिची 2023 मध्ये नराधम शिक्षक लकी राय याच्यासोबत ओळख झाली. त्याने पीडितेल खासगी क्लासेसची माहिती देत तुला करीअरसंदर्भात योग्य मार्गदर्शन करेल असा विश्वास दिला. त्यानंतर या नराधमाच्या जाळ्यात अडकलेल्या विद्यार्थिनीने 2024 साली त्याच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान संधी साधत या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना ठार मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर अनेक वेळा अतिप्रसंग केला. अखेर शिक्षकाच्या जाचाला कंटाळून पीडितेने हा सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यानंतर आईवडिलांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

सलग दोन महिने अत्याचार
2024 मध्ये विद्यार्थिनीने क्लासमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला या नराधमाने तिच्यावर वॉच ठेवला. त्यानंतर त्याने ऑक्टोबरमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सलग दोन महिने तो तिच्यावर अत्याचार करत होता. मात्र आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने या नराधमाचा अत्याचार सहन केला. अखेर 21 जून रोजी पीडितेने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर करकर्मी शिक्षकाचा पर्दाफाश झाला.