तुळजापूरात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। तुळजापूर

रत्नागिरी ते नागपूर महामार्गाच्या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमीनींचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापूरात रास्ता रोको करण्यात आला. सर्वांना राष्ट्रीय महामार्गाच्या दराने मोबदला दिला जावा अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केली. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना एक निवेदनही दिले.

तुळजापूरातील बसस्थानकासमोरी चौकात स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको करण्यात आला. यावेळी विविध राजकीय नेत्यांबरोबरच शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

तुळजापूर शहराची हद्द पाच किलोमीटर परिघात आहे असे आंदोलकांचे मत आहे, पण करण्यात आलेली वर्गवारी अन्यायकारक असल्याने ती रद्द करावी. तसेच चार राष्ट्रीय महामार्गासाठी नव्याने होत असणारे रस्ते आणि सिंदफळ, हंगरगातळ, कांक्रबा, तडवळा, ही गावे पाच किलोमीटर परिघात असून शहराच्या तुलनेत मोबदला मिळावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी भाषणातून केली आहे.

दरम्यान, केवळ एक हजार ते पाच हजार रुपये मूल्यांकन केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जमिनीला पाच लाख ते सात लाख प्रतिगूंठा दर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने  सरकारला दिला आहे.