इस्त्रायलने आता दक्षिण बेरुतनंतर लेबनॉनमधील हिजबुल्लाहला लक्ष्य करून आपल्या हल्ल्याची व्याप्ती वाढवली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लेबनॉनच्या उत्तरेकडील शहर त्रिपोलीवर शनिवारी पहाटे इस्त्रायलकडून हल्ला झाला. इस्त्रायली सैनिक लेबनॉनमधील ओडाइसेह या दक्षिण शहरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे.
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनच्या राजधानीतील लोक दहशतीत असून ते मोठ्या प्रमाणावर सीरियात स्थलांतरित होत आहेत. आतापर्यंत सुमारे 20 लाख नागरिकांनी सीरियात आश्रय घेतल्याची माहिती मिळते.
इस्रायलने बेरूत-दमास्कस रोडवर बॉम्बफेक करून हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे विस्थापित कुटुंबांना पायी सिरियात जाण्यात अडचणी येत आहेत. आयडीएफने सांगितले की, इस्रायली हवाई दलाने मशिदीच्या आत असलेल्या कमांड सेंटरमध्ये कार्यरत हिजबुल्लाह दहशतवाद्यांवर हल्ला केला. इस्रायलने सांगितले की, लेबनॉनमधून शनिवारी सकाळी इस्रायलच्या हद्दीत पाच रॉकेट डागण्यात आले.
इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हिजबुल्लाहच्या केंद्रीय गुप्तचर मुख्यालयाला लक्ष्य केले. इस्रायलने गेल्या 24 तासांत 100 हून अधिक हिजबुल्लाहच्या सदस्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या भागात सलग 10 हून अधिक हवाई हल्ले झाल्याची माहिती दिली आहे. हिजबुल्लाहचे सदस्य आणि नागरिकांसह सुमारे 1,400 लेबनीज या हल्ल्यात मारले गेले आहेत.