गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक, नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावठी कट्टे विकण्यासाठी जाणाऱया दोनजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर-जामखेड रस्त्यावरील टोलनाक्यावरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टय़ांसह दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

संदीप पोपट गायकवाड (वय 40, रा. जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. वाघोली, रायसोनी कॉलेजसमोर, डोमखेल रोड, पुणे), भारत भगवान हतागळे (वय 25, रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नगर-जामखेड रस्त्यावरील बंद असलेल्या टोलनाक्याजवळ दोन इसम हे गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकाने नगर-जामखेड रोडवरील टाकळी काझी शिवारातील बंद असलेल्या टोलनाक्यावर सापळा लावला. त्यावेळी टोलनाक्याच्या बाजूला असलेल्या एक बंद इमारतीमागे दोनजण संशयितरीत्या उभे असलेले दिसले. हेच आरोपी असल्याची पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांना घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे व दोन मोबाईल असा 80 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल भाऊसाहेब सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात ‘आर्म्स ऍक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार नानेकर, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल राहुल सोळंके यांनी ही कारवाई केली.