उच्चभ्रू कुटुंबीयांना खंडणी मागणाऱ्या दोन इंजिनियरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

उच्चभ्रू कुटुंबीयांना खंडणी मागणाऱ्या दोन बी टेक इंजिनियरला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वाकड पोलिसांनी सामान्यांच्या वेशात वावरून ही कारवाई केली. रोहित यादव आणि अभिनव मिश्रा अशी दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिल्लीहुन दोघे खंडणी घेण्यासाठी विमानाने शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. या दोघांचा मित्र कुटुंबीयांच्या उच्चभ्रू सोसायटीत राहायला होता. श्रीमंत कुटुंब असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी या कुटुंबाकडून खंडणी मागायला सुरुवात केली. त्यांच्या 21 वर्षीय मुलीचा फोन नंबर फेसबुकवरून मिळवला. तिच्या फोनवर मेसेज आणि फोनकरून धमकावणे सुरू झाले. खंडणी न दिल्यास त्या मुलीचे अपहरण करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. 19 सप्टेंबर या तारखेला पहिला फोन आला होता, तेंव्हापासून वाकड पोलिसांनी तपास सुरू केला. पाच लाख रुपयांची खंडणी मागणारे उच्च शिक्षित असल्याने परराज्यातील वेगवेगळ्या शहरात जाऊन फोन करत होते. अखेर त्यांना रक्कम देऊ असे सांगताच ते शुक्रवारी दिल्लीहून विमानाने पुण्यात आले. शहरात विविध ठिकाणी ते फिरले शेवटी वाकड हद्दीत त्यांना बोलावण्यात पोलिसांना यश आले. सर्व समाजातील वेशात असणारे पोलीस त्यांच्या मागावर होते, अखेर काळेवाडी येथे त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.