विक्रोळीत वाहन अपघातात दोघांचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रोळी येथे झालेल्या वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. श्रेया सावंत आणि संकेत कुटे अशी त्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

सायली सावंत घाटकोपरच्या बर्वेनगर येथे तिच्या मावशीकडे राहते. शुक्रवारी रात्री त्या परिसरात साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. पालखी विक्रोळी येथून शिर्डीला जाणार होती. सायली ही तिची मावसबहीण श्रेयासोबत पालखी सोहळ्याला गेली होती. पालखी मुलुंडपर्यंत पायी जाणार असल्याने त्या दोघींनी पालखीला जाण्याचे ठरवले.

रात्री एक वाजता पालखी मुलुंड येथे पोहचली. त्यानंतर त्या दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या. सायली ही तिचा भाऊ शेखर नाईक आणि श्रेया ही तिचा मित्र संकेतसोबत मोटारसायकलवरून विक्रोळीच्या दिशेने येत होती. भांडुप परिसरात पाच खड्डा येथे त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला. त्या अपघातात ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्या दोघांना सायन रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी संकेतला मृत घोषित केले तर श्रेयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी आले. विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.