
किराणा सामान घेण्याच्या किरकोळ वादातून दोघे एकमेकांना भिडले. बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि एकाने दुसऱयाच्या हातावर लोखंडी पत्रीच्या तुकडय़ाने वार करून पळ काढला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी तपास करून आरोपीला पकडले. मो. अख्तर कुरेशी (45) असे त्या आरोपीचे नाव आहे. नागपाडय़ाच्या सुखलाजी स्ट्रीट येथे कुरेशी आणि या गुह्यातील फिर्यादीचे किराणा सामानावरून वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शब्दाने शब्द वाढत गेले आणि दोघांनी एकमेकांवर हात उचलला. त्यावेळी कुरेशी याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी पत्रीच्या तुकडय़ाने दुसऱयाच्या हातावर वार केले. त्यानंतर कुरेशी पसार झाला. अखेर नागपाडा पोलिसांनी नळबाजार येथे लपलेल्या कुरेशीला पकडून बेडय़ा ठोकल्या.

























































