
सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातांमध्ये दोनजण ठार झाले, तर तीनजण जखमी झाले आहेत. सिद्धेश आनंद सावंत (वय 35, रा. वेणेगाव, ता. सातारा), सुमीत लक्ष्मण निकम (रा. नागठाणे, ता. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
वेणेगाव येथे वार्षिक यात्रेच्या निमित्ताने ऑर्केस्ट्रॅाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो संपल्यानंतर तेथील सिद्धेश आनंदराव सावंत, निखिल सावंत, सूरज सावंत, विशाल देशमुख हे चारचाकी वाहनाने खोडद फाटय़ावर काही कामासाठी गेले होते. पहाटे साडेचार वाजता घरी परतत असताना, वारणानगर (लांडेवाडी, ता. सातारा) गावच्या कमानीजवळ असणाऱ्या वळणावर चालक सिद्धेश सावंत याचा चारचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी खड्डय़ात कोसळून तीन वेळा उलटली. यात चालक सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. निखिल सावंत यांनी या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली.
दुसऱ्या घटनेमध्ये नागठाणे (ता. सातारा) येथील ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीच्या यात्रेचा छबिना सुरू होता. छबिन्यात योगेश गोरख पवार, ओंकार दत्तात्रय साळुंखे (दोघे मूळ रा. गणेशवाडी, सध्या रा. नागठाणे), सुमित लक्ष्मण निकम (रा. नागठाणे) हे मित्र हजर होते. रात्री साडेतीन वाजता हे तिघेजण काही कामानिमित्त सुमीत याच्या शेडवर दुचाकीवरून गेले होते.
दुचाकीवरून ट्रॅीपल सीट परत नागठाण्याकडे येत असताना चालक ओंकार साळुंखे याच्याकडून गाडी वेगात रस्त्यावरून खाली जाऊन झाडावर धडकली. यात सुमीत निकम हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा साताऱ्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती योगेश पवार याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अपघातांच्या दोन्ही घटनांचा तपास हवालदार प्रवीण शिंदे, कॉन्स्टेबल प्रकाश वाघ करत आहेत.




























































