मोबाईलपायी डॉक्टरने पाय गमावला; सराईत मोबाईलचोर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मोबाईलचोराचा पाठलाग करताना लोकलखाली आल्याने होमियोपॅथी डॉक्टरला एक पाय गमवावा लागला. या घटनेची गंभीर दाखल घेऊन वडाळा रेल्वे पोलिसांनी तपास करून मोहम्मद फरान मोहम्मद नसीम खान आणि मोहम्मद मोबीन मोईन खानला अटक केली. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प येथे राहणारे अख्तर अली मेहबूब अली हे होमियोपॅथी डॉक्टर आहेत. 29 मार्चला ते मानखुर्द ते सँडहर्स्ट रोड असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान फरानने त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल चोरल्यावर फरान  पळू लागला. अख्तर अली यांनी त्याचा पाठलाग सुरू केला, मात्र त्यांना फलाटाचा अंदाज न आल्यामुळे ते लोकलखाली आले. लोकल अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू कला. रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पोलीस उपायुक्त एम. मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुधीर नावगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिर्के, डी. एस. जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस शिपाई नीलेश बोकेफोडे, जगदाळे, रूपनर, पवार, नरळे, कांबळे, जाधव यांनी तपास सुरू केला.पोलिसांनी त्या ठिकाणची सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर  मंगळवारी रे रोड परिसरात सापळा रचला व फरानला ताब्यात घेतले. त्यानंतर मोबीनला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते. फरान हा मोबाईल चोरतो. चोरलेले मोबाईल तो नशेकरिता कमी किमतीत विकतो. त्याच्या विरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला गेल्या वर्षी तडीपार केले होते.