
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिह्यातील हरीश महाजन यांची गोष्टच न्यारी आहे. एकेकाळी अवघ्या दोन हजार रुपयांच्या पगारावर ते नोकरी करत. आज मात्र त्यांनी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे.
चंद्रावर जमीन विकत घेणारे हरीश महाजन हे हिमाचल प्रदेशातील दुसरे नागरिक आहेत. त्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल लुनार लँड्स सोसायटी या संस्थेत आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यांनी चंद्रावर एक एकर जमीन घेतली. त्याची कागदपत्रे त्यांना संस्थेने ऑनलाइन पाठवली आहेत.
पत्नीला वाढदिवसाची भेट
ही जमीन लेकस सोमनिओरम (लेक ऑफ ड्रीम) या चंद्रावरील प्रदेशात आहे. ती त्यांनी पत्नीला वाढदिवसाची भेट दिली आहे. आज ते बांधकाम व्यावसायिक आहेत, मात्र जुने दिवस ते विसरलेले नाहीत. ज्या परिस्थितीतून आपण वर आलो त्या परिस्थितीतील लोकांना सहाय्य करणे आपले कर्तव्य असल्याचे ते सांगतात. आपण केवळ ‘थ्रील ’म्हणून जमीन घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या जमीन खरेदीची चर्चा चांगलीच रंगली आहे.




























































