
सामना ऑनलाईन । गुरूग्राम
गुरूग्राममधील सुशांत लोक भागात एका 12 वीच्या विद्यार्थ्याने आपल्या दोन काकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. आधी ही तक्रार बाल कल्याण विभागाकडे केली गेली. त्यानंतर सदर तक्रार जवळच्या पोलीस स्थानकात नोंदवली गेली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या विद्यार्थ्याने नुकतंच 18 व्या वर्षात पदार्पण केले. 2007 ते 2015 या काळात आपल्या काकांनी आपले लैंगिक शोषण केल्याचे त्याने सांगितले. दोघे त्याच्यासोबत अश्लील वर्तणूक करत. याबात त्याने आपल्या वडिलांना सांगितले. परंतु त्याच्या वडिलांनी त्याची मदत करण्याऐवजी त्याला मारहाण केली आणि याबद्दल कुठेच वाच्यता न करण्याचे बजावले.
त्याच्यानंतर या विद्यार्थ्याने आपल्या आईकडे ही गोष्ट सांगितली. आईने बाल कल्याण विभागात धाव घेतली. बाल कल्याण विभागात त्याचे समूपदेशन केल्यानंतर पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली.
प्राथमिक तपासात विद्यार्थ्याच्या आई आणि वडिलांमध्ये हुंड्यावरून वाद सुरू आहे. महिलेने आपल्या पती आणि दोन भावांवर आरोप केले आहेत. या आरोपात खरंच तथ्य आहे की कौटुंबिक वादामुळे हे आरोप होत आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.



























































