टेमघरच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या देखरेखीखाली सुरू आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच येत्या सप्टेंबर महिनाअखेरीस तज्ज्ञ समितीकडून टेमघरच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली जाणार आहे.

जलसंपदा विभागातर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबविण्याचे, तसेच धरणाच्या सक्षमीकरणाचे काम केले जात आहे. या कामामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली आहे, परंतु धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. गेल्या वर्षी टेमघर धरणातून पाणी सोडून दुरुस्तीची कामे करण्यात आली. यंदाही जानेवारी २०१९ पासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

त्यामुळे सध्या धरण क्षेत्रात पाऊस होत असूनही टेमघर वगळता सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठवले जात आहे, तर टेमघर धरण ६५ टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्याला पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याने टेमघर धरण रिकामे करून धरणाच्या भेगांमध्ये सिमेंट भरण्याचे काम केले जात आहे. धरणाच्या दुरुस्तीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या चार बैठका झाल्या आहेत. समितीची पाचवी बैठक सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, तसेच समितीच्या सदस्यांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली जाणार असून, समितीकडून आपेक्षित कामांची माहिती जलसंपदा विभागाला दिली जाणार आहे.

दरम्यान, टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सेट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशनकडून (सीडब्लूपीआरएस) चांगले मार्गदर्शन मिळाले. गेल्या वर्षापासून टेमघरच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल. त्यासाठी डिसेंबर महिन्यापासून टेमघर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात येईल, असे पुणे पाटबंधारे प्रकल्प महामंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.

summary- two years for repairing work of temghar dam