
यकृताच्या दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या दोन वर्षांच्या बाळावर परळच्या वाडिया रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वाडियामधील हे पहिले यकृत प्रत्यारोपण ठरले असून रुग्णालयात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची सर्वसमावेशक सुविधा सुरू करण्यात आली आहे.
आयटी पंपनीत काम करणारे विक्रोळीतील योगेश आणि सुप्रिया हे दांपत्य निभिषच्या जन्मामुळे आनंदी झाले होते, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण बाळाला जन्मतः पीएफआयसी-2 म्हणजेच प्रोग्रेसिव्ह फॅमिलीअल इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस आणि जन्मानंतर लगेच कावीळ झाली. निभिष अवघ्या दोन वर्षांचा होता. जेव्हा त्याच्या पालकांना सांगण्यात आले की, त्याला यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वाडिया टीमने एकजुटीने या शस्त्रक्रियेसाठी काम केले. यूकेमधील बर्मिंगहॅम चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे मुख्य प्रत्यारोपण सर्जन प्रो. डॅरियस मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली वाडियातील प्रोफेसर हेड पेडियाट्रिक सर्जरी डॉ. प्रज्ञा बेंद्रे आणि प्रोफेसर गॅस्ट्रोएन्टेरो आणि हेपॅटोलॉजी डॉ. इरा शाह यांनी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
आमच्या बाळाला यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर आमच्यासाठी पायाखालची जमीनच सरकली. मात्र डॉक्टरांच्या कुशल टीमने यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून माझ्या बाळाचे प्राण वाचवले. आता तो सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल. डॉक्टरांच्या अमर्याद प्रयत्नांबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे रुग्णाचे वडील योगेश वाजे यांनी सांगितले.
…तेव्हा आम्ही कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतो
जेव्हा एखाद्या कुटुंबातील मुलासाठी प्रत्यारोपणाचा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा वाडिया हॉस्पिटल त्याच्या पाठीशी उभे राहत स्थानिक अधिकारी, धर्मादाय संस्था आणि इतर संस्थांकडून कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करून रुग्णाला नवे आयुष्य बहाल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटल्सच्या संचालिका डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.
























































