एसी रिपेयर करायला गेलेल्या तरुणांना बेदम मारहाण, गुप्तांगावर टाकले पेट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसी रिपेयर करायसाठी गेलेल्या तरुणांना त्या घरातील व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना हरयाणातील फरिदाबाद येथे घडली आहे. एवढ्या जबर मारहाणीने ते तरुण अर्धमेले झाले होते त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

सदर तरुणांना राजीव कॉलनीत राहणाऱ्या रतन डागर याचा एसी रिपेयर करण्यासाठी फोन आला होता. तरुणांनी त्यांना दुपारी येतो असे सांगितले. मात्र त्यांना डागर यांच्याकडे पोहोचायला संध्याकाळचे सात वाजले. त्यावरून डागर त्यांच्यावर भडकला. दरम्यान डागर व त्याचे काही मित्र घरात दारू पित बसले होते व त्यावेळी ते तरुण एसी रिपेयर करत होते. त्यावेळी तरुणांनी एसी उद्या रिपेयर होईल असे सांगितले. त्यावरून डागर भडकला व त्याने तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून तरुणांना अर्धमेले होईपर्यंत मारले. त्यांचे कपडे फाडले. त्यानंतर त्यांच्या गुप्तांगावर पेट्रोल ओतले. ते त्यांना पेटवून देणार इतक्यात घरातल्या महिलांनी त्यांना रोखले.

अर्धमेल्या अवस्थेत तरुणांना घराबाहेर काढले. ते तरुण कसेबसे त्यांच्या घरी पोहोचले त्यावेळी त्यांच्या घर मालकाने त्यांना पाहिले व त्यांना मारहाणीबाबत विचारले. तरुणांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर घर मालकाने तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले व पोलिसांत तक्रार देखील दाखल केली. दरम्यान पोलीस आता डागर व त्याच्या मित्रांचा शोध घेत असून ते फरार झाल्याचे समजते.