महायुतीत सातारा-माढय़ाच्या जागेवरून तिढा; उदयनराजे कमळ चिन्हावर लढण्यावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
udayanraje-bhosale

महायुतीत सातारा-माढयाच्या जागेवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. साताऱयातून उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून घडय़ाळ चिन्हावर निवडणुकीत उभे राहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. परंतू उदयनराजे कमळ चिन्हावर लढण्यावर ठाम आहेत. माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना होत असलेल्या विरोधामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी मागे घेऊन ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सातारा लोकसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले आणि त्यांचे समर्थक कमलीचे आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांनी बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. पण, त्यातून फारसा समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीला पोहोचले आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी घडयाळ चिन्हावर लढावे, असा प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता, पण, त्यांनी तो धुडकावून लावत कमळ चिन्हावर लढणार असल्याचे ठामपणे सांगितले.

जागा आणि उमेदवाराची अदलाबदल
माढा लोकसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील आग्रही आहेत. त्यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना फारसं यश आलेलं नाही. धैर्यशिल यांनी गावभेटी सुरू करत एक प्रकारे आपला प्रचारही सुरू केला आहे.अजितदादा गटाचे रामराजे निंबाळकर भाऊ संजीव याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी बैठक घेऊनही रामराजे ऐकायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर महायुतीत सातारा आणि माढय़ाची जागा आणि उमेदवाराची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे.