
शिवतीर्थ म्हणजे राज्याच्या, देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या लाखोंच्या सभा… शिवतीर्थ म्हणजे शिवसेना आणि त्यासोबत डौलाने फडकणारे भगवे झेंडे… हे समीकरण, हे नाते एवढे घट्ट आहे. आजही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत होता, पण त्यासोबत खांद्याला खांदा लावून ताठ मानेने उभा होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा. शिवतीर्थावर आजही अतिविराट गर्दीच्या उधाणलाटा उसळल्या, पण हे उधाण होते अभिमानाचे… शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या सरकार स्थापनेचा अभिमान, नवस्वातंत्र्याचे तुफान! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांना वंदन आणि आईवडिलांचे स्मरण करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा कोटी कोटी मनांतून जयजयकार झाला. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर आणि लाखो डोळय़ांत आनंदाश्रू अशा हर्षोल्हासात संपूर्ण महाराष्ट्रात एकच गर्जना घुमली… कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला. हे राज्य, हे सरकार माझे, आपले, तुमचे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील कोटय़वधी जनतेला दंडवत घातला आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. शिवतीर्थावरील हा ऐतिहासिक आणि भव्य शपथ सोहळा अवघ्या जगाने पाहिला.

मी महाराष्ट्राच्या तख्तावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन हे वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. हे वचन आज पूर्ण झाले. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आज शपथ घेणार हा क्षण टिपण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सकाळपासूनच शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी जनता शिवतीर्थावर दाखल होत होती. यात शेतकरी, कामगार, उद्योजक, सेलिब्रिटी, राजकारणी अशा सर्वच स्तरांतील व्यक्तींचा समावेश होता, तर दुसरीकडे ज्यांना शिवतीर्थावर पोहचता आले नाही असा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक टीव्हीसमोर बसून श्वास रोखून या क्षणाची वाट पाहत होता. क्षणाक्षणाला शिवतीर्थ गर्दीने खचाखच भरत होते. शपथविधीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरही मान्यवरांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले आणि शिवतीर्थावरील जमलेल्या जनतेने एकच जल्लोष केला. त्यानंतर काही क्षणांतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय’ असा एकच जयघोष झाला. मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू होत असल्याची सूचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अजोय मेहता यांनी उच्चारताच ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणला. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून भव्य व्यासपीठासमोरील पोडियमसमोर उभे राहत, ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून…’ असे वाक्य उच्चारताच उपस्थितांच्या आनंदाला भरतेच आले. शिवतीर्थावर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. या जल्लोषपूर्ण वातावरणातच उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. फटाक्यांचा कडकडाट, शिवतीर्थावरील गगनभेदी घेषणांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वाक्षरी केली. त्यानंतर एका क्षणातच संपूर्ण जनतेसमोर नतमस्तक होत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले.

देशभरातून मान्यवरांची उपस्थिती
शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर उपस्थित होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, टी. आर. बालू, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार, धनंजय मुंडे, पीआरपीचे नेते जोगेंद्र ककाडे, सपा नेते अबु असीम आझमी, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, आमदार कपिल पाटील, शिकसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, आमदार रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

व्यासपीठावर अवतरली शिवशाही
ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर खास भव्यदिव्य व्यासपीठ बांधण्यात आले होते. या व्यासपीठाला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले होते. मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठत आणि अश्वारूढ प्रतिमा उभारण्यात आली होती. तसेच स्वराज्याची शिवमुद्राही व्यासपीठावर कोरण्यात आली होती. त्यामुळे शिवशाही अवतरल्याचा भास या ठिकाणी होत होता. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ साकारण्यात आले. तब्बल 6 हजार चौरस फुटांच्या या व्यासपीठावर 100 हून अधिक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बसू शकतील इतका तो भव्यदिव्य व्यासपीठ दिसत होता. शपथविधी सोहळ्याचा प्रत्येक क्षण याचि देही याचि डोळा प्रत्येकाला पाहता यावा, अनुभवता यावा यासाठी शिवतीर्थावर 20 हून अधिक एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त
शिवतीर्थावर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त होता. दोन हजार पोलीस, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथक यांच्याशिवाय साध्या वेशातील पोलिसांचाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या विराट गर्दीत वावर होता. या गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानात, आजूबाजूच्या परिसरात विशेष काळजी घेतली जात होती. कार्यकर्त्यांनी यावेळी तोबा गर्दी केली होती, परंतु पोलिसांनी केलेल्या अचूक योजनेमुळे कुठलाही गडबडगोंधळ झाला नाही. वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे कुठल्याही प्रकारे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.



























































