
मराठा समाजाला सरकारने जाहीर केलेले आरक्षण कायद्याच्या सर्व निकषांवर सर्व पातळ्यांवर टिकावे हीच आमची सर्वांची प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया विशेष अधिवेशनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सरकारच्या हेतूवर आपण आत्ता तरी संशय घेणार नाही, पण या आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेकांना बलिदान करावे लागले हे नाकारता येणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडला गेला त्या त्या वेळी तो एकमताने मंजूर झाला होता. 2018मध्येही झाला होता आणि आजही झाला. पूर्वीचा अनुभव लक्षात घेता ज्या खात्रीने हे विधेयक आज पुन्हा मांडले गेले त्यावरून ते टिकणारे असेल अशी आशा करूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिल्यापासूनच शांततेने सोडवता आला असता. मनोज जरांगे-पाटील जालन्यात उपोषणाला बसल्यानंतर जो लाठीचार्ज झाला आणि डोकी पह्डण्यात आली ते व्हायला नको होते, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
मराठा समाजाला शिक्षणात देण्यात आलेले आरक्षण कितपत मिळतेय ते नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा कळेलच, असे सांगतानाच, नोकऱयांमध्ये आरक्षण दिलेय तर मराठा समाजातील किती जणांना कुठे नोकऱया मिळणार तेसुद्धा सरकारने लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलेय असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पण न्यायालयात ते टिकेल का? असा सवाल करताना उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनीही खात्री घेतली होती याची आठवणही करून दिली.
महाविकास आघाडीत आरक्षणावरून दुमत नाही
महाविकास आघाडीमध्ये आरक्षणावरून दोन मते असल्याचे दिसून येत आहे असे पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर आघाडीमध्ये दुमत नसून आम्ही मराठा आरक्षणाला मंजुरी दिली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या महिन्यातही गुलाल उधळला होता, पण नंतर समजले, फसलो!
गेल्या महिन्यातही मराठा आरक्षण दिले म्हणून गुलाल उधळला गेला होता, पण नंतर समजले की मराठा समाजाची फसवणूक झाली. त्यामुळे कुठलीही खात्री पटल्याशिवाय सध्याच्या सरकारवर विश्वास ठेवणे योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारने हे आरक्षण टिकेल याची हमी घेतली खरी, पण ती निवडणुकीच्या तोंडावर घेतली आहे. त्यामुळे आरक्षण दिल्याचे दाखवून निवडणूक काढून तर घेतली जात नाही ना, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. सध्या तो प्रश्न आपण उपस्थित करून राजकारणात पडणार नाही, पण मुख्यमंत्री कोण आहेत, कसे आहेत, त्याचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीसांना सणसणीत टोला
सरकारने दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्याबद्दल माध्यमांनी विचारले असता, दिलेला शब्द पाळणे ही जर का त्यांची ओळख असती तर भाजपने मलाही शब्द दिला होता, तो पाळला असता तर पह्डापह्डी करावी लागली नसती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
निवडणुकीच्या तोंडावर हे आरक्षण दिले गेले आहे. हे आरक्षण टिकेल अशी हमी सरकार देत आहे. मी आताच त्यावर कोणताही संशय घेणार नाही. यात राजकारण करणार नाही – उद्धव ठाकरे





















































