
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या रायगड लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोली येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये भगवे चैतन्य संचारले असून सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱयाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. उद्या हा झंझावात रत्नागिरी जिह्यात धडकणार आहे. उद्या गुरुवारी 14 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवाद होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथील आझाद मैदानावर जनसंवाद होणार आहे. त्याआधी दापोली येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गिते, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते आणि आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदम उपस्थित राहणार आहेत.


































































