
सामना प्रतिनिधी । मुंबई
अयोध्येत राममंदिर उभे राहायलाच हवे आणि राहणारच, अशी घोषणा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशभरात हिंदू चैतन्याचे एक वादळच निर्माण केले आहे. 24 आणि 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असून त्यांच्या या नियोजित दौऱ्याला देशभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी शिवसेना भवनात देशभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी नारा दिला, ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर, फिर सरकार!’ तेव्हा प्रचंड घोषणांनी शिवसेना भवन अक्षरशः दुमदुमून गेले!!
अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नावरून शिवसेनेने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा खेचली आणि त्याचा टणत्कार अवघ्या देशात घुमला. दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असे जाहीर केले आणि त्यानंतर देशभरातील प्रसारमाध्यमे, धर्मपीठ आणि सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये एकच चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्याची. राममंदिर उभारणीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवलीत, मग आता मंदिर बांधणार कधी? असा रोखठोक सवाल करून उद्धव ठाकरे यांनी राममंदिरासाठी अध्यादेश आणा अशी जाहीर मागणी केली. या मागणीला प्रचंड पाठिंबा मिळाला. संत-महंतांच्या धर्मादेश बैठकीतही हीच मागणी झाली. राममंदिरासाठी देशभरातील संत-महंत आता अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहेत. एवढेच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांतील, प्रांतातील शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि हिंदू बांधव लाखोंच्या संख्येने अयोध्येत जाणार आहेत.
कुंभकर्णाला जागे करण्यासाठीच
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारीशिवसेना भवनात देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. दौऱयाच्या नियोजनावर या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, कुणालाही आव्हान देण्यासाठी आपण अयोध्येत जात नसून ज्यांनी राममंदिर बांधण्याचे वचन दिले, पण पाळले नाही त्या झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठीच माझी अयोध्या यात्रा आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर, फिर सरकार’ असा नाराही दिला तेव्हा प्रचंड घोषणांनी शिवसेना भवन दणाणून गेले.
दौरा कार्यक्रम
उद्धव ठाकरे यांचे 24 नोव्हेंबर रोजी दुपारी अयोध्या नगरीत आगमन होणार असून 3 वाजता लक्ष्मण किला येथे श्री विध्वंत संत पूजन आणि आशीर्वादोत्सव कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शरयू नदीच्या नया घाट येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होईल. 25 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता उद्धव ठाकरे श्री रामजन्मभूमीचे दर्शन घेणार आहेत.
महिला आघाडी व युवासेनेने महाराष्ट्रातच थांबावे
महिला आघाडी आणि युवासेनेने अयोध्येत न येता महाराष्ट्रातच थांबावे. आणीबाणीच्या प्रसंगी राज्यात त्यांची गरज आहे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. सर्वच मंत्री तसेच आमदार-खासदारांनी अयोध्येत येण्याची गरज नाही, असे सांगतानाच अयोध्येत कायदा-सुव्यवस्था मोडेल असे वर्तन करू नका. शिस्त पाळा असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले.
राज्यासह देशभरातील मंदिरांमध्ये 24 नोव्हेंबरला ‘महाआरती’
उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता अयोध्येत शरयू नदीची महाआरती करणार आहेत. त्याच दिवशी आणि त्याच वेळी महाराष्ट्रासह देशभरातील सर्व मंदिरांमध्ये ‘महाआरती’ होऊन राममंदिर उभारणीच्या कार्यास पाठिंबा दिला जाणार आहे.
चोख नियोजन
- शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी असून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील प्रभू, अजय चौधरी, ऍड. अनिल परब, अंबादास दानवे आणि भाऊसाहेब चौधरी यांच्यावर समन्वय आणि कार्यक्रम अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.
- अयोध्या दौऱ्यासाठी दोन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून शिवसेना भवनातील नियंत्रण कक्ष शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत सांभाळतील तर अयोध्येतील नियंत्रण कक्ष अनिल देसाई पाहणार आहेत, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सांगण्यात आले.

























































