
ऐतिहासिक आणि अभूतपूर्व… शिवतीर्थावर झालेला शिवसेनेचा आजचा दसरा मेळावा अफाट असाच ठरला. तुफान पाऊस आणि चिखलातही निष्ठेचे अद्भुत दर्शन महाराष्ट्रासह देशाला घडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने मुंबई आणि महाराष्ट्रद्वेष्टय़ांना खणखणीत आवाज दिला. भाजपला अक्षरशः झोडपून काढले. ‘मुंबई जिंकण्यासाठी भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत. आम्ही मुंबई जिंकली तर खान महापौर होईल, असा प्रचार करत आहेत. पण ते जिंकले तर जानवं घालून आणि शेंडी ठेवून ‘समर्पयामी’ म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील,’ असा हातोडाच उद्धव ठाकरे यांनी चालवला. ‘भाजपवाले व्यापारी दृष्टीने मुंबईकडे बघतात, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो. त्यामुळे भाजप मुंबई जिंकूच शकत नाहीत,’ अशी गर्जनाच उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या गर्जनेला शिवसैनिकांनी वज्रमूठ आवळून आणि घोषणा देत जोरदार प्रतिसाद दिला. पाऊण तासाच्या तुफानी भाषणात उद्धव ठाकरे यांनी आगामी ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. त्यांचे भाषण संपेपर्यंत एकाही शिवसैनिकाने मैदान सोडले नाही. शिवसेनेच्या या विराट मेळाव्याची देशभरात चर्चा आहे.
भाजपच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र आणि देशात सुरू असलेल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे देशाचे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मुद्द्याला हात घालत राज्यातील व केंद्रातील सरकारचा समाचार घेतला. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले असताना सुलतानी कारभार करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामने, सोनम वांगचुक यांची अटक आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदी सरकारवर आसूड ओढले.
‘जिवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यातलं सोनं असतं. हे सोनं आपल्याकडं असल्यामुळेच अनेक पक्षांचं शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. काही जणांना त्यांनी पळवलंही आहे. पण जे पळवलं ते पितळं होतं, सोनं माझ्याकडे आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असलेले भगवी शाल गुंडाळलेले एकनाथ शिंदे यांचे पोस्टर मुंबईत काही ठिकाणी लागले आहेत. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी आज शिंदेंवर बोचरी टीका केली. ‘वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदाच पाहिलं. गाढवावर कितीही शाली टाका, गाढव ते गाढवच राहणार. अमित शहांच्या जोड्यांचा भार वाहणारं हे गाढव आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच
शिवतीर्थावर उपस्थित गर्दीला अभिवादन करताना, अशी जिवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यातील सोनं आहे, अशी कृतज्ञता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळेच आपली शिवसेना पह्डण्याकडे अनेकांचे लक्ष आहे, पण त्यांनी जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची प्रशंसा केली.
अस्मानी संकटामुळे शेतकरी उद्विग्न होऊन रडत असताना सध्या भाजपची औलाद पगारी मतदार तयार करतेय. आपल्याला आता ठरवायचं आहे की आपण भाजपचे पगारी मतदार बनणार की स्वाभिमानी मतदार. पंतप्रधान तिथे दिल्लीत बसलेयत. एक फुल दोन हाफने दिल्लीत जाऊन बसायला हवं होतं. सर्व निकष बाजूला ठेवून आम्हाला भरघोस मदत द्या असं सांगायला हवं होतं. पण केंद्राला प्रस्ताव हवाय. फडणवीस अभ्यास करत बसलेयत. त्यांना माहीत आहे की काही दिवसांनी लोकं विसरतील. थोडंस काहीतरी हातावर टेकवलं की निवडणूका पार पाडू, असे त्यांना वाटतंय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्ला केला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हुकूमशाहीवर उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रहार केला. लडाखमधील सोनम वांगचुक यांचे उदाहरण त्यांनी दिले. ते म्हणाले की, जो लढेल तो तुरुंगात जाईल, अशी देशात परिस्थिती आहे. सर्वांनी विरोध करूनही राज्यात जनसुरक्षा कायदा लागू केला गेला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही कारण सांगितलं. पण सोनम वांगचूक हे देशभक्त आहेत, त्यांनी लेह लडाखसारख्या दुर्गम भागात अनेक कामं केली. थंडीत काम करणाऱ्या जवानांसाठी त्यांनी सोलार छावण्या बांधून दिल्या. पाण्याची कमतरता होती त्या ठिकाणी आईस स्तूपच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले. वांगचूक यांनी लडाखच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू केला. पण मोदींनी त्यांच्यावर रासुका लावला. आता वर्षभर तरी ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. मोदींची स्तुती करेपर्यंत वांगचुक देशभक्त होते, आता देशद्रोही कसे झाले? एका परिषदेसाठी पाकिस्तानमध्ये गेले म्हणून ते देशद्रोही ठरले, मग गुपचूप पाकिस्तानला जाऊन नवाझ शरीफ यांचा केक खाणारे मोदी कोण? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. तीन वर्षे मणिपूर जळतेय, पण आता काल-परवा मोदी मणिपूरला गेले. मोदीही जायला तयार नव्हते आणि दुसरे व्यापारीही नाही, असे म्हणत त्यांनी पेंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावरही शरसंधान केले. मोदी मणिपूरला जाऊन काहीतरी तोडगा काढतील, लोकांचे सांत्वन करतील असे वाटले होते. पण त्यांनी तिथे गेल्यानंतर भाषण केले. मणिपूरच्या नावातच मणी आहे, असे ते म्हणाले. मणिपूरच्या नावातील मणी मोदींना दिसला, पण भररस्त्यात धिंड काढल्या गेलेल्या तिथल्या लोकांच्या डोळ्यातील पाणी दिसले नाही, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
महाराष्ट्राबद्दल द्वेष असल्यामुळेच मोदी मदत करत नाहीत
महाराष्ट्रातील शेतकरी हताश झालाय, तो लढतोय. पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरू आहे. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर दहा-दहा हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत, असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
फडणवीसांच्या राज्यात बजबजपुरी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात सगळी बजबजपुरी करून ठेवली आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी वाढत्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, आज एका अधिकाऱ्याला पकडलंय. काही दिवसांपूर्वी वसई-विरारच्या अधिकाऱ्याला पकडलंय. अधिकाऱ्यांना अटक होतेय. पण जे मंत्री राजरोस बॅगा उघडून बसलेयत त्यांना हात लावायची हिंमत होत नाही. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जातायत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जातायत. पुरावे सादर केले तरी मुख्यमंत्री त्यांना समज देऊन सोडून देतायत. हा तुमचा कारभार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली.
भाजपकडून मुंबईत न केलेल्या कामांचे श्रेय
मुंबईतील कोणत्याही कामांमध्ये भाजपचा संबंध नसतानाही फुकटचे श्रेय घेतले जात असल्याचे उदाहरण उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ मुख्यमंत्री असताना आपण स्वतः केला होता. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही होते. जितेंद्र आव्हाडांनी त्यासाठी मेहनत घेतली होती. आता भाजपवाले म्हणतात की, त्यांनीच बीडीडी चाळ उभी केली. कोस्टल रोडही महाविकास आघाडीच्या प्रयत्नातून झालाय. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत 24 तास दुकाने व आस्थापने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वप्रथम केली होती. त्या वेळी मकाऊमध्ये जाऊन नाईटलाईफ जगणारे आमच्यावर टीका करत होते. आता त्यांनीच त्यासंदर्भात निर्णय घेतला आहे, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
मुंबई महापालिकेची निवडणूक लावाच, जनता वाटच बघतेय
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लावाच, जनता वाटच बघतेय, असे आव्हान या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे, अख्खी मुंबई भोगतेय, जरा पाऊस झाला तरी मुंबई भरतेय, मेट्रो-मोनो सुरू ठेवण्यापेक्षा मुंबईत बोट सेवा सुरू करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. याच मुंबईत अमित शहा भाजपचा महापौर झालाच पाहिजे असं बोंबलून दिल्लीला परत जातायत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
भाजप म्हणजे अमिबा
भाजपची तुलना या वेळी उद्धव ठाकरे यांनी एकपेशीय अमिबाशी केली. भाजप म्हणजे अमिबा झाला आहे. तो वेडावाकडा पसरतो. जिथे गरज वाटेल तिथे युती करतो. शरीरात गेला की पोट बिघडवतो. तसे हे भाजपवाले समाजात घुसले की शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आरएसएसचा ब्रह्मराक्षस झालाय
उद्धव ठाकरे यांनी या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना काही प्रश्न उपस्थित केले. संघाला 100 वर्षे पूर्ण झाली. ज्या कामासाठी संघाने मेहनत घेतली त्या मेहनतीला आज विषारी फळे मिळाल्याचे पाहिल्यावर भागवत यांना समाधान वाटतेय का, आनंद मिळतोय का, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. कदाचित मोहन भागवत यांना सांगता येत नसेल. आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला तर ब्रह्मराक्षस झालेला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ब्रह्मराक्षस हा शब्द आपण जाणीवपूर्वक वापरतोय, असे सांगत सर्वांनी घरी जाऊन गुगलवर त्याबाबत सर्च करून पहा, असा मिश्कील सल्लाही त्यांनी दिला.
मोहन भागवत हिंदुस्थानचे राष्ट्रपिता की पाकिस्तानचे?
हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेच्या अंगावर येताना मोहन भागवत यांची गेल्या काही वर्षांतली वाक्ये आठवा असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावले. हिंदू-मुस्लिम यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी भागवत यांनी दिल्लीत बैठक घेतली होती, मग त्यांनी हिंदुत्व सोडले असे बोलायची भाजपवाल्यांची हिंमत आहे का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 2022मध्ये आलेल्या बातमीचा दाखलाही त्यांनी या वेळी दिला. भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर मुसलमानांचे सर्वोच्च नेते उमर अहमद इलियासी यांनी भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याचे त्या बातमीत लिहिले होते. मग भाजपवल्यांनो, जा विचारा त्यांना, ते हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणाले की पाकिस्तानचे, असाही संतप्त सवाल त्यांनी केला.
भाजपवाले हिंदू तरी आहेत का?
मोहन भागवत बोलले, या देशात राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग त्यांचे चेले चपाटे हिंदू-मुस्लिम का करत आहेत? हा देश जो स्वतःचा मानतो तो शिवसेनेचा आहे. त्या सोफिया कुरेशी यांना भाजपवाले पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण म्हणाले होते. एकीकडे सोफिया कुरेशा यांना भाजपवाले पाकिस्तान्यांची बहीण म्हणतात. दुसऱ्या बाजूला बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांची स्वागत मिरवणूक काढतात. त्याच वेळी पंतप्रधान मोदी सांगतात, मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या. भाजपवाले हिंदू तरी आहेत का? जा स्वतःचं तपासून घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आशिया कप जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
– मेळाव्याला रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. व्यासपीठावर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाझे, शिवसेना नेते भास्कर जाधव, अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, राजन विचारे, अंबादास दानवे, आमदार सुनील राऊत, महेश सावंत, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, साईनाथ दुर्गे, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार मनोज जामसूतकर, संजय पोतनीस, अनंत (बाळा) नर, हारुन खान, उपनेते सचिन अहिर, नितीन बानुगडे पाटील, अरुण दुधवडकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, सूरज चव्हाण, उपनेत्या किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, सुषमा अंधारे, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत मिळाली नाही तर शिवसेना मराठवाडयात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांसाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने काढले जातील असेही ते म्हणाले. देशात अंधभक्त वाढलेत, त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढून त्यांना देशभक्ती दाखवणे हाच आता आपला कार्यक्रम असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
शेतकऱ्यांना मदत करा
मराठवाडय़ात अभूतपूर्व अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण शिवसैनिकांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहेच, पण घरादारातही चिखल झाला आहे. सर्वांना खायला घास देणारा शेतकरी आज विचारतोय आम्ही खायचं काय, अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. मराठवाडा आपत्तीग्रस्त झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठीला हात लावाल तर हात जागेवर ठेवणार नाही
‘भाषावार प्रांतरचनेत गुजराती लोकांना गुजरात मिळालं. बंगाली लोकांना बंगाल मिळालं. कानडी लोकांना कर्नाटक मिळालं, तसा मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला राजधानी मिळाली नव्हती. मराठी माणसाने रक्त सांडून ही मुंबई मिळवली. ही मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या ज्या पंडय़ा पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे जाणार का? उद्धव ठाकरे येणार का? त्या सगळा मराठीद्वेष्टय़ांना सांगतो, तुम्ही आमच्या मराठीला हात लावून दाखवा. तुमचा हात जागेवर ठेवणार नाही’, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
विभागाच्या वतीने आमदार आणि विभागप्रमुख महेश सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती उद्धव ठाकरे यांना भेट दिली. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विभाग संघटक श्रद्धा जाधव, विभाग निरीक्षक यशवंत विचले, शशी फडते उपस्थित होते.
शस्त्र्ापूजन
शिवसेनेचा दसरा मेळावा हा सांस्कृतिक सोहळाच असतो. यंदाही परंपरेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्यासपीठावर शस्त्र्ापूजन करण्यात आले.
जी. जी. पारीख यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. जी. जी. पारीख यांचे आज निधन झाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, अशी लढणारी माणसं कमी झाली आहेत. आपल्या सर्वांकडून पारीख यांना आदरांजली वाहतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.