
पूरग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने जाहीर केलेले 32 हजार कोटींचे पॅकेज म्हणजे इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक आहे. राजा उदार झाला आणि हाती टरबूज दिला! खरवडून गेलेल्या जमिनीसाठी साडेतीन लाख रुपये देणार आहेत. कसे देणार? रोख 47 हजार आणि उरलेले मनरेगातून! मग याच तीन लाखातून एक लाख रुपये दिवाळीच्या अगोदर शेतकऱयांच्या खात्यात टाका, असे जाहीर आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या फसव्या पॅकेजच्या चिंधड्या उडवल्या. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, त्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, असेही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. दिवाळीनंतर मी स्वतः गावागावांत जाऊन शेतकऱयांना पॅकेजमधला खडकू तरी मिळाला का, असे विचारणार आहे आणि हाच आमचा कार्यक्रम असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
सप्टेंबर महिन्यात मराठवाडय़ावर आभाळ कोसळले. घरदार, शेतशिवार सगळे महापुरात वाहून गेले. जमिनी खरवडून गेल्या. शेतकरी उघडय़ावर आला. जगायचे कसे, या भ्रांतीत असलेल्या शेतकऱयाची फडणवीस सरकारने 32 हजार कोटींच्या पॅकेजचे मृगजळ दाखवून अक्षरशः फसवणूक केली. शेतकऱयांच्या मदतीसाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात ‘हंबरडा मोर्चा’ काढला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ऑक्टोबर महिन्यातील तळपत्या उन्हात निघालेल्या या मोर्चात मराठवाडय़ाच्या कानाकोपऱयातून आलेल्या शेतकऱयांसोबत हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
मोर्चेकऱयांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या 32 हजार कोटी रुपयांच्या फसव्या पॅकेजच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवल्या. ‘राजा उदार झाला आणि हाती…’ असे म्हणून उद्धव ठाकरे क्षणभर थांबले तोच समोरून ‘भोपळा, भोपळा’ असा आवाज आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ‘भोपळा नाही, टरबूज’ अशी पॅकेजची जोरदार खिल्ली उडवली. शेतकऱयांची थट्टा चालवलीय या सरकारने, असा हल्ला करत उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. काय सांगता, शेतकऱयांना म्हणे इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज दिले आहे. चला, मी समर्थन करतो पॅकेजचे, पण एक अट आहे. सरकारने जमीन वाहून गेलेल्या शेतकऱयाला साडेतीन लाख रुपये देण्याचा शब्द दिला आहे. माझे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान आहे, शेतकऱयांना पॅकेजची वाट कशाला बघायला लावता, या साडेतीन लाखातले एक लाख रुपये दिवाळीआधी शेतकऱयाच्या खात्यात टाका! बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात असा हा सगळा फसवा मामला.
मेहनत शेतकरी करणार अन् अंडी सरकार उबवणार
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या फसव्या पॅकेजची अक्षरशः लक्तरेच काढली. काsंबडीसाठी सरकार 100 रुपये देणार आहे. बाजारात सध्या चिकनचा भावच दोनशेपेक्षा जास्त आहे. मेहनत शेतकरी करणार अन् अंडी कोण सरकार उबवणार? तसेही हे सत्तेच्या खुर्च्या उबवतच आहेत. गायीसाठी 37 हजार रुपये देणार आहेत. दुभत्या गायीची बाजारात पिंमत 1 लाखापेक्षा जास्त आहे. गुरेढोर वाहून गेली. जी जनावरे वाचलीत त्यांना खायला कडबा नाही. शेतकऱयाने खायचं काय, माती! कर्जाचे पुनर्गठन करणार म्हणतात. तुम्हाला नवं जुनं करून पाहिजे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करताच मोर्चेकऱयांनी ‘शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. निवडणुकीत शेतकरी कर्जमुक्त करण्याचा शब्द दिला होता ना, काय झाले त्याचे? मी मुख्यमंत्री असताना कोणत्याही अटी शर्तीशिवाय शेतकरी कर्जमुक्त केला होता. तेव्हा माझी नियत काढत होता. आता मी विचारतो, शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याची तुमची नियत आहे की नाही? असा जोरदार पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
पाकव्याप्त कश्मीरात कधी घुसणार?
सरसंघचालक मोहन भागवत हे अलीकडेच अखंड भारताबद्दल बोलले. तिकडे पाकव्याप्त कश्मीरात कधी घुसताय? सांगा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आत्महत्या करू नका, हिमतीने लढा शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा मुकाबला एकाच वेळी करायचा आहे. तेव्हा खचू नका, आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. शिवसेना तुमच्या सोबत नव्हे, खांद्याला खांदा देऊन या लढाईत तुमच्या सोबत असेल अशी ग्वाहीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.
पोस्टरवर मंत्री, संत्री, वाजंत्री वाजवणारे
छत्रपती संभाजीनगरात शेतकऱयांना पॅकेज दिल्याबद्दल मोठमोठे होर्डिंग्ज लागले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! मात्र त्या पोस्टरवर शेतकरी नाही, तर मंत्री, संत्री आणि वाजंत्री वाजवणारे आहेत! त्यांनी स्वतःच जाहीर करायचे अन् स्वतःच स्वतःची पाठ खाजवून घ्यायची! उद्धव ठाकरे यांनी असा टोला लगावताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.
पुरात मदत करणाऱया शिवसैनिकांचा अभिमान
मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडली होती, तेव्हा सरकार कुठे होते? माझा शिवसैनिक मदतीसाठी धावला होता. ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, अंबादास दानवे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवले. हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत, त्यांचे शिवसैनिक आहेत. या शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पुरात मदतीसाठी धावलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
कर्जमुक्ती होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही!
पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाडय़ात आलो होतो. पाच जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली. शेतकऱयांना भेटलो. अतिशय विदारक चित्र आहे. त्याचवेळी मी म्हटले होते, जोपर्यंत सरकार माझा शेतकरी कर्जमुक्त करणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यावेळी आलो तेव्हा पाऊस होता, आता कडक ऊन आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा कसा होणार, अशी चिंता अनेकांना लागली होती. जिथे शेतकऱयाच्या आयुष्याचाच चिखल झालाय तिथे आपण चिखलात बसलो तर कुठे बिघडले. भर पावसात शिवसैनिकांमुळे मेळावा दणक्यात झाला. आजही कडक ऊन असताना मोठय़ा संख्येने जनता आपल्यासोबत आली आहे, हाच आपला आधार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
राजकारण करू नका म्हणता आणि…
शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की ‘राजकारण करू नका’ अशी दमबाजी करतात. शेतकऱयांच्या मतांवर निवडून येतात आणि त्यालाच दम देतात असे हे फडणवीसांचे सरकार! या सरकारचे एक तरी काम धड आहे का? सगळा मामला उफराटा. पॅकेजमध्ये पाच हजार कोटी रुपये पीक विम्यासाठी दिले आहेत. किती शेतकऱयांनी पीक विमा काढला आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित शेतकऱयांनी ‘नाही, नाही’ असे उत्तर दिले. शेतकऱयांचा या सरकारवर विश्वासच राहिला नाही. एक रुपयात पीक विमा देत होते, कुठे गेला तो? शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारच्या पीक विम्याची केलेली चिरफाडच उद्धव ठाकरे यांनी यावेळी शेतकऱयांसमोर मांडली. आता पीक कापणीचा निकष लावलाय विम्यासाठी. शेतात काहीच उरले नाही, या निकषाचे काय करायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पंतप्रधान आले आणि गेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, दोन दिवस होते. भाषणे केली त्यांनी, पण एकाही भाषणात ना अतिवृष्टीचा उल्लेख, ना शेतकऱयाचा! राजधानीत शेतकरी येऊ नये म्हणून त्याच्या वाटेत खिळे ठोकणारे यांचे सरकार! बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. कोणीही न मागताच पंतप्रधानांनी बिहारमधील 75 लाख महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये टाकले. इकडे शिवभोजन बंद, आनंदाचा शिधा बंद! निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकदाच दिले होते. आता कोणी अडवलेय तुम्हाला? 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते. काय झाले त्याचे? पण फक्त निवडणूक जिंकायची! मत चोर, गद्दी छोड! असा जबरदस्त हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तिकडे दहा हजार देता, महाराष्ट्राने काय घोडे मारले तुमचे? पंतप्रधान देशाचे आहात ना, देशातल्या सगळय़ाच महिलांच्या खात्यावर पीएम केअर फंडातून टाका पैसे, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
अधिकारी बांधावर आलाच पाहिजे
ज्यांनी 50 खोके घेतले, त्यांच्याकडे आपण 50 हजार रुपये हेक्टरी मागत आहोत. त्यामुळे ते सरळमार्गाने वठणीवर येणार नाहीत. आता तुम्ही जो आसूड, चाबूक दिला आहे, तो तुम्हाला हाती घ्यावा लागेल आणि त्यांना वठणीवर आणावे लागेल. अधिकाऱयांनी बाबूगिरी करता कामा नये, तुम्हीही शेतकऱयांचीच पोरे आहात हे लक्षात ठेवा. शेतकऱयासाठी अधिकाऱयाला बांधावर यावेच लागेल, तो उर्मट वागला तर त्याला जागेवरच धडा शिकवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारची सावकारी सुरू आहे
लाडक्या साखर कारखानदारांना सरकार थकहमी देते, मग शेतकऱयांना का नाही? आता उैस उत्पादकांची लुबाडणूक करण्यात येत आहे. सरकारच सावकारी करत आहे. ज्यांनी शेतकऱयांना लुटले, त्या साखर कारखानदारांना शिक्षा व्हायला पाहिजे, ते टगे साखर कारखानदार आता भाजपमध्ये आराम करत आहेत. मागे मोदी यांनी तुमचे मंगळसूत्र चोरतील असा कांगावा केला होता. आता शेतकऱयांवर त्याच्या बायकोचे मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आलीय. पण यांचे धार्मिक भावनेवर राजकारण सुरूच आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हंबरडा नाही, हा इशारा आहे!
आपले सरकार असताना आपण शेतकरी कर्जमुक्त केला. नियमित कर्ज फेडणारांना आपण 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देणार होतो. त्याचवेळी गद्दारी झाली. आपले सरकार गेले आणि हे नतद्रष्ट सरकार आले. त्याची फळे तुम्ही शेतकरी भोगता आहात. तुमचे आता तरी डोळे उघडणार आहेत की नाही? आभाळच फाटलंय, शिवणार तरी कुठे कुठे? हा हंबरडा नाही, इशारा आहे! शेतकरी कर्जमुक्त करा, नाहीतर संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. संकट येते तेव्हा हे सरकार शेतकऱयांना दमबाजी करते. निवडणुका येऊ द्या, बघा कसे गुडघ्यावर येतील, तुमच्याशी गोड गोड बोलतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात विरोधी पक्षनेता नसेल तर दोन उपमुख्यमंत्री कशाला हवेत?
राज्याला विरोधी पक्षनेता नाही. लोकशाहीत विरोधी पक्षाचा आवाज महत्त्वाचा मानला जातो. पण यांना विरोधकच संपवायचेत! विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक नाही असे सांगतात. उपमुख्यमंत्रीपद हे घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार दिले आहे ते सांगा. जर विरोधी पक्षनेतेपद घटनात्मक नसेल तर आमच्यासाठी कोणीही उपमुख्यमंत्री नाही, हे तर साधे मंत्री! राज्यात विरोधी पक्षनेता नसेल तर दोन उपमुख्यमंत्री कशाला हवेत, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेता नाही म्हणून काय झाले? ही जनताच तुमच्या बोकांडीवर बसणार, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
मी कर्जमाफी केली तेव्हा काय डोळे बंद होते का?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी किती मदत केली होती? त्यांना पॅकेजवर बोलण्याचा काय अधिकार, अशी मखलाशी मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. त्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मला बोलण्याचा काय अधिकार आहे असे फडणवीस म्हणतात, मग करा ना शेतकरी कर्जमुक्त! मी शेतकऱयांना अटी-शर्तीशिवाय कर्जमाफी दिली तेव्हा काय डोळे बंद करून बसला होता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.