हिंदीची सक्ती कराल तर आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

”तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आणि तसा प्रयत्न जरी कराल तर तुम्हाला आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही”, अशा खणखणीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व महायुती सरकारला दिला. वरळीतील विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजपची व मिंध्यांचा समाचार घेत त्यांची चांगलीच सालटी काढली. या विजयी मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षांनी एकत्र आले. त्यांच्या या

छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी! कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला! आवाज कुणाचा? मराठीचा!!! अशा गगनभेदी घोषणांनी आणि ढोल ताशांच्या आवाजाने मुंबईचा वरळी भाग दणाणून सोडला होता. हिंदी सक्तीवर मराठी जनांच्या शक्तीने मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी जनांची पाऊले मुंबईच्या दिशेने वळली. भगवे फेटे, शेले, भगव्या पताका, मराठी फलक, लेझीम, ढोल ताशा पथक अशा दृश्यांनी वरळी परिसर सजला होता. एका बाजूला सागराला आलेलं उधाण आणि दुसऱ्या बाजूला मराठी जनसागराच्या उसणाऱ्या लाटा अशी जणू स्पर्धाच लागल्याचं चित्र आज मुंबईत पाहायला मिळालं. प्रत्येक मराठी चेहऱ्यावर अभूतपूर्व उत्साह दिसत होता. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा अनुभव यावेळी आला. महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते, मराठी साहित्यिक, मराठी कलाकार, विविध क्षेत्रांतील मराठी मान्यवरांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली. खच्चून भरलेल्या या वरळी डोम मधील जनसागराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी ‘जमलेल्या माझ्या तमाम…’ या वाक्याने साद घालताच अंगावर शहारे आले आणि जनसागराला प्रचंड उधाण आल्याचं पाहायला मिळालं…

उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृहात एकच जल्लोष झाला. उद्धव ठाकरे यांनी पहिलंच वाक्य ”बऱ्याच वर्षानंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली” हे उच्चारलं व त्यानंतर मराठी प्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या भेटीला ग्रँड सॅल्युटल दिला. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ”राज मला सन्मानीय उद्धव ठाकरे असं बोललेला आहे. त्याचंही कर्तुत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून आज माझ्या भाषणाची सुरुवात मी ‘सन्मानीय राज ठाकरे व जमलेल्या माझ्या मराठी हिंदू बांधवांनो व भगिनीनो व मातांनो अशी करतो. राजने भाषणाची अप्रतिम बांधणी केली त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सहाजिकच आहे सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणाकडे होतं. पण मला असं वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची त्यांच्याकडून अपेक्षा नाहीए. पण एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच संपूर्ण डोम सभागृह टाळ्यांच्या कडकटाने दणाणून निघालं.

”मला कल्पना आहे की आज अनेक बुआ महाराज बिझी आहेत. कुणी लिंब कापतंय, कोण टाचण्या कापतंय. कोण गावी अंगारे धुपारे करत असेल. रेडे कापत असतील. या सगळ्या भोंदूपणाविरोधात माझ्या आजोबाांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून तुमच्यासमोर ठाकलेले आहोत. भाषेवरून जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात मी काय, राजने काय, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं? कोणत्या भाषेत बोलत होतात? भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात ते म्हणत होते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा अस्सल, कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय, अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.

”1992-93 साली जेव्हा देशद्रोही मातले होते. तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनाही माझ्या शिवसैनिकांनी वाचवलं होतं. देवेंद्र फडणवीस आज जे काही बोलले आहेत की भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल व त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आहोत आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही आणि जर तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. फडणवीसांचं आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्यावेळी सखा पाटलांनी केलेलं वक्तव्य आठवतंय. दिल्लीत जो बसतो त्याचे पाय चाटणारे असतात त्यांना मी बाटगे म्हणतो. सखा पाटील बोलले होते, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत? आम्ही झुकवलं, वाकवलं व ही मुंबई आपण मिळवली, मुंबई जेव्हा आपण मिळवली तेव्हा तत्कालिन काँग्रेसवाले होते ते मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हते. आज जे बोलताय की आम्ही मराठी नाही का? त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही फक्त नावाला मराठी आहात तुमच्या अंगात रक्त आहे की नाही याचा तपास करावा लागेल; अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”एक निशाण, एक प्रधान, एक विधान. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच पण तो आपला राष्ट्रध्वज असला पाहिजे. ते भाजपचं फडकं नाही. आता यांनी नवीन टुमणं काढलं आहे. वन नेशन वन इलेक्शन. हळूवारपणाने एक एक करत हिंदी हिंदू हिंदुस्थान करतील. हिंदू हिंदुस्थान मान्य आहे. पण तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी यांनी एक फेक नरेट्वीव्ह परसरवलं की ही हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंच्या काळातली आहे. मी अभिमानाने सांगेन की मी मुख्यमंत्री असताना मी महाराष्ट्रात मराठीची सक्ती केलेली. त्याचा मला अभिमान आहे. काय केलंत त्या मराठी भाषा सक्तीचं तुम्ही? मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची करावी लागते. महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतर काही लोकं कोर्टात गेले. कोण आहेत ते मराठीचे दुश्मन. ती गुंडगिरी नाही होत का? ही सगळी यांची पिलावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. हे म्हणतात, मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला, जर असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 सालानंतर तुम्ही मुंबई व महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले. मुंबईतून सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले. तेवढंच फक्त हिंदुस्थान व हिंदू आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

”तुम्ही गद्दारी करत आमचं सरकार पाडलं. तुम्ही हे सर्व दिल्लीत जे तुमचे मालक बसले आहेत त्यांचे बूट चाटण्यासाठी केलं. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत आपण आलो. डोळ्यादेखत आपले लचके तोडले जातायत. दोघांना भांडवलं जातंय. आम्ही एकत्र येणार हे समजल्यानंतर. आम्ही फक्त महापालिका निवडणूकीपर्यंत एकत्र येतोय असं काही जण म्हणाले. काही जण म्हणतात यांचा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्र देखील काबिज करू. आज तर निवडणूका नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय की सत्ता येते व सत्ता जाते पण आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे. संकट आलं की आपण मराठीजण एकत्र येतो व सत्ता गेली की आपण भांडायला लागतो. हा नतद्रष्टपणा आता करायचा नाही. गेल्या विधानसभेत ते बोलले की बटेंगे तो कटेंगे. सुरुवातीला वाटलं की यांनी हे हिंदू मुसलमानांमध्ये केलं. पण हिंदू मुसलमानांसोबत सोबतच यांनी ते खासकरून मराठे व मराठेतरांमध्ये केलं. गुजरात हरयाणात हेच केलं. विधानसभेच्या वेळी यांनी बटेंगे तो कटेंगे ही भिती निर्माण केली. मराठी माणूस एकमेकांसोबत भांडला व दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर राज्य करायला लागले. आपण फक्त त्यांच्या पालख्या व्हायच्या का? आपण त्यांच्या पालख्यांचे भोई होणार की आपल्या माय मराठीला सन्मानाने पालखीत बसवणार आहात?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मराठीप्रेमींना केला.

”आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहेत. स्टार ऑफ घाना असं काहीतरी मी वाचलं. इकडे घाण आणि तिकडे स्टार ऑफ घाणा. एका बाजूला मोदींचा फोटो, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा नांगराचा जोखड घेऊन जमिन नांगरतानाचा फोटो. खरोखर पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे. आज मी दोन बातम्या वाचल्या. एक लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद होणार आहे, आता नव्याने नोंदणी होणार नाही. संपूर्ण देशात सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपण चौपाटीला मराठी रंगभूमीचं दालनाचा आराखडा मंजूर केला. तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला व ती जागा आता त्यांच्या मालकाच्या घशात टाकतायत. हा मराठीचा तुमचा अभिमान. मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन मी केलं होतं. कुठे गेलं ते भवन. का तुम्ही आमची मराठी मारताय? अनेकदा सांगितला की आम्ही कोणत्ही भाषेच्या विरोधात नाही. पण आमच्यावर सक्ती केलात तर तुम्हाला आमची शक्ती अशी दाखवू की पुन्हा डोकं वर नाही काढणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

”आमचा हनुमान चलिसाला विरोध नाही. पण मारुती स्तोत्र का विसरायला लावता? आमचा जय श्री रामला विरोध नाही. पण भेटल्यानंतर राम राम म्हणणारे आम्हीच मराठी. जय जय रघुवीर सांगणारे संत रामदास होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिला रामाचं नाव घ्यायला शिकवलं. तो एक गद्दार जय गुजरात बोलला. किती ती लाचारी. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

”कुणावर अन्याय करू नका पण तुमच्यावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही असं म्हणत आहात. एक मराठी भाषिक दाखवा जो इतर राज्यात जाऊन गुंडगिरी करतो. पण तुमचे चेले चपाटे उठतात. कुणावरही आरोप करतायत. तमाशे करतायत. कोणताही माणूस भाषेवरून इतर राज्यात जाऊन दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्याला उभा चिरून टाकतील. बंगाल तमिळनाडूत जाऊन बघा. इथे अनेक अमराठी लोकं आले असतील. या पुढे कोणत्याही पक्षाचे असू संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी जशी एकजूट झाली होती तशी आता झाली. ज्या राज्यात राहता, ज्या मातीत जन्माला आलात ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचे उघड उघड धिंडवडे काढणार असतील. आणि पक्षीय मतभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असून तर असं षंढाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्रा हा शूरांचा वीरांचा आहे… यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही… आम्ही कुणावर दादागिरी करणार नाही, आणि कुणी केली तर ती सहनही करणार नाही. मराठा- मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर असे सर्व मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसांची एकजूट करा. तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मराठीप्रेमींना केले.