पुन्हा नोटाबंदी कराल तर देशात अराजक होईल, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एकदा नोटाबंदी फसल्यानंतर आता ‘नीती’ आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणताहेत, गरज पडली तर पुन्हा नोटाबंदी होईल. हे जर खरं असेल तर देशात अराजक होईल. जनता शांत बसणार नाही. संतापाचा भडका उडेल, असा इशारा देतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘या लोकांना देशाचा कारभार कळतो की नाही,’ असा घणाघात केला. आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेताना ‘भाजपने आता बेटी भगाओ कार्यक्रम सुरू केला आहे काय,’ असा परखड सवाल करीत भाजपवर आसुड ओढले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच अन्य पदाधिकाऱयांची बैठक बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटाबंदीच्या अहवालाबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, नोटाबंदी फसली त्याची जबाबदारी कोण घेणार? देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे नुकसान झालं आहे ते कोण भरून देणार. रांगेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांची जबाबदारी कोण घेणार? ही आमची चूक होती हे तुम्ही स्वीकारणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.

नवोदित वाल्मीकींचं रामायण
आपण राजकारण साफ करणार नसू, जर कोणीही वाल्या घेऊन त्याचा वाल्मीकी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर तो वाल्मीकी ऋषींचा अपमान आहे. नितीन गडकरी बोलले होते वाल्याचा वाल्मीकी करण्याची ताकद आमच्यात आहे. हे नवोदित वाल्मीकी यांचं रामायण जर का आपण बघितलं तर भाजपने कार्यक्रम बदलून ‘बेटी भगाव’ कार्यक्रम दिलाय की काय असा प्रश्न पडतो.

हिंदुत्ववाद्यांच्या सरकारमध्ये हिंदू दहशतवादी का होताहेत?
हिंदुत्व दहशतवाद हा शब्द हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच पुढे येतोय या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी हे दुर्दैव असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, दहशतवाद्यांना किंवा आतंकवाद्यांना धर्म असत नाही, आतंकवाद हाच त्यांचा धर्म. अशा वेळी त्यांना हिंदू आतंकवादी, शहरी नक्षलवाद अशा उपाधी लावण्याची काय गरज. या सगळय़ांना या सरकारच्या काळातच सक्रिय का व्हावंसं वाटलं. हिंदुत्ववाद्यांचं सरकार असेल तर त्या देशात हिंदू दहशतवादी का तयार होताहेत, असा सवाल त्यांनी केला.

आधी न्यायालयात पुरावे सादर करा
शहरी नक्षलवाद, हिंदू दहशतावादाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता नवीन प्रकार समोर आला आहे. कोर्टात केस होण्याआधीच पोलिसांकडून पुरावे जाहीर केले जातात त्याबद्दल कोर्टानेही नाराजी व्यक्त केली आहे. शहरी नक्षलवादाबद्दल ज्यांना पकडलं त्यांच्याबद्दल असेल किंवा सनातनबद्दल असेल; यात काही तथ्य असेल तर वेळेत आरोपपत्र दाखल व्हायला हवे. नाहीतर कर्नल पुरोहित, प्रज्ञा सिंग यांच्यावर इतक्या वर्षांनंतर अजूनही आरोपपत्र ठेवण्यात आलेलं नाही. जर पुरावे असतील तर ताबडतोब आरोपपत्र दाखल करा. गुन्हेगार असतील त्यांना पाठीशी घालण्याची शिवसेनेची भूमिका नाही. केवळ संशयपिशाच्च घेऊन भूत उभं करायचं आणि कालांतराने पुरावे नसतील तर काय. खऱयाचे पुरावे अततील तर ते आधी कोर्टात सादर करा.

ज्या गोष्टी पटत नाहीत त्या विरोधी पक्षापेक्षाही प्रभावीपणे मांडतो
शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडणार हा प्रश्न घासून गुळगुळीत झालेला आहे. आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करीत आहोत. एक काळ असा होता की काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला आहे की काय इथपर्यंत बोलण्याची राष्ट्रवादीची हिंमत गेली होती. मात्र तेव्हा त्यांना तुम्ही सत्तेतून बाहेर कधी पडणार हे विचारलंदेखील नाही. आम्ही सत्तेत राहून जनतेसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करून घेता येत असतील त्या करून घेत आहोत. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या विरोधी पक्षापेक्षाही अधिक प्रभावीपणे आम्ही मांडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

हार्दिक, उपोषण सोड… तू लढवय्या आहेस!
बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेल याला केलेल्या फोन कॉलची माहिती पत्रकार परिषदेत दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील मराठा, धनगर समाजाप्रमाणेच गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. हार्दिक पटेलने हा मुद्दा उचलला असून त्यासाठी तो उपोषणाला बसलाय. आज त्याच्या उपोषणाचा बारावा दिवस आहे. मी हार्दिक पटेलला फोन केला. त्याला फोन करून सांगितलं तू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानतोस. त्यांनी उपोषणावर कधी विश्वास ठेवला नाही. तू लढवय्या आहेस. उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही. उपोषण त्यांच्यासमोर करायचं असतं ज्यांना संवेदना आहे. तू उपोषण सोड, पुढच्या लढय़ासाठी त्या समाजाला आणि गुजरातला तुझी गरज आहे. तुझ्यासोबत न्याय्य हक्काच्या मागणीसाठी शिवसेना नेहमी राहील, असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जर अतिरेकी किंवा पाकिस्तानशी बोलणी झाली पाहिजेत अशा सूचना येत असतात. तर आपल्याच देशातील तरुणांशी संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत. सरकारने ताणून न धरता हार्दिकसोबत चर्चा करून प्रश्न सोडवायला हवा.

राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये
भाजपच्या राम कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपच्या आमदारांनी अकलेचे तारे तोडले आहेत. ही हीन वृत्तीची माणसं आहेत. मग ते परिचारक असतील, छिंदम असेल किंवा कालपरवाचे राम कदम; ते जे कोणी असोत, माता-भगिनींचा अवमान करणारे असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यापुढे कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देता कामा नये. जसा देशद्रोही परिचारक हा जवानांच्या माताभगिनींबद्दल बोलला त्याच पद्धतीने राम कदम बोलले असून भाजपने, मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून तत्काळ जी कारवाई आहे ती तुमच्यातील धाडसाने करावी, अशी शिवसेनेची मागणी आहे.