महाराजांच्या महाराष्ट्राचा व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”छत्रपती शिवाजी महाराज म्हणायेच की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देढाला देखील हात लावायचा नाही. इथे हे नाशिकमध्ये आल्यावर कांदा शेतकऱ्यांना अडवलं जातंय. शेतकऱ्यांना अडकवून ठेवणारे यांचे नतद्रष्ट सरकार कुठे आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठे. आज यांना आपण मुंबईत रस्त्यावर आणलं आहे. लवकरच महाराजांच्या महाराष्ट्राचा व व शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावणार; असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमधील हुतात्मा कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ जाहीर विराट सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार व मिंधे सरकारची सालटी काढली.

”आज आपले मोदीजी सुद्धा नाशिकमध्ये होते. त्यांना एवढा ताण पडलाय मनावर. कुणीतरी सांगितलं की ते झोपंतच नाही. झोप अपुरी झाली की मेंदूवर परिणाम होतो. लोकं भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात. हिंदुहृदयसम्राटांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे शिवसेनेला नकली म्हणतात. यांना कुठे मूळ फुटले काय माहिती. तेलंगणाच्या सभेत हे मला नकली संतान म्हणाले. मोदीजी तुम्ही माझा पक्ष फोडला, माझं धनुष्यबाण चोराच्या हातात दिला आहे पण आता सर्वत्र मशाल जोरदार पेटली आहे. हे लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

”भाजपकडे सर्व फोर्स आहे तरीसुद्धा ते उद्धव ठाकरेला घाबरतात. शिवेसनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट व माँसाहेबांच्या आशिर्वादाने माझ्याबाजूला एक कवच तयार केलं आहे. नकली संतानं तर यांना मांडीवर घ्यावी लागत आहे. आणि एक नकली संतान मांडीवर घेतलं ते तर अक्षरश: वाह्यात निघालं. प्रफुल पटेल. काल महाराजांचा जिरेटोप यांनी मोदींच्या डोक्यावर घातला. आज शेतकऱ्यांची गांधी टोपी मोदींनी घातली. रोज टोप्या बदलणारा पंतप्रधान चालेल का तुम्हाला. वाटेल त्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घालू नका. तुम्ही प्रफुल पटेल असाल तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. कुणाच्या डोक्यावर ठेवता जिरेटोप ठेवता. मोदींची पात्रता आहे का महाराजांची बरोबरी करायची. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं राज्य कसं चालत होतं. त्यांच्या राज्यात महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्यांचे हातपाय तोडायचे. आणि मोदीजी तुम्ही काय करताय? मणिपूरमध्ये महिलांची धिंड निघाली. तिकडे जायची हिंमत नाही. ना मोदींची ना शहांची. अशा मोदींची महाराजांच्या जिरेटोपाला हात लावायचा काय दर्शन घ्यायची पात्रता नाहीस असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”कांदा उत्पादकांवर निर्यांतबंदी आहे. बंदी काढली तर कर लावतात. स्वत:च्या गुजरातमध्ये निर्यातबंदी उठवता. का हा असा भेदभाव करताय. हा महाराष्ट्र पुरेसा आहे तुम्हाला गुजरातमध्ये पाठवून द्यायला. गद्दारांना पन्नास खोके देता आणि माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देत नाही. मी शेतकऱ्यांना वचन देतोय की इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या हिताचा निर्णय घेऊ. यांच्या सरकारने शेतमालावर लावलेला जीएसटी आपलं इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर जीएसटी काढून टाकणार. आपल्या महाराष्ट्राचं वैभव मी परत आणल्याशिवाय राहणार नाही. साधी महानंदा डेअरी यांनी गुजरातच्या घशात घातली. सगळं महाराष्ट्राचं देऊन टाक गुजरातला असे यांचे धोरण आहे. डेअरी दिली तर दिली वरून अडीचशे कोटी दिले”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”मोदी शेहेनशाह सारखे फिरत आमच्यावर टीका करत आहे. मोदींकडे एकच रेकॉर्ड आहे. आमची घराणेशाही. मी मोदींना आवाहन करतो मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या, मी माझी घेऊन येतो. सगळं सांगतो. माझ्या घराणेशाहीने काय काय़ महाराष्ट्रासाठी केलं ते दाखवतो. तुम्ही तुमची खरी वंशावळ दाखवा. कधी सांगता रेल्वे स्थानकावर चहा विकत होता, कधी हिमालायत गेले होतो, बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात होतो. वाटेल ते थापा मारताय. पण आता आम्ही तुम्हाला थारा देणार नाही. गेल्या दोन वेळेला आमची चूक होती. त्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. 2019 साली मोदींना मत द्या सांगायला आलेलो. यांच्या मनात जे विष आहे ते आता बाहेर पडलं आहे. ज्या पद्धतीने माझा घात करण्याचा प्रयत्न केला. सोन्यासारखी माझी शिवसेना चोरली. छत्रपतींच्या भगव्याला मोदींनी गद्दारीचा कलंक लावला आहे. याचा पुरावा या मिंध्यांनीच दिला आहे. गेल्या आठवड्यात मिंध्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं की त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला आणि मग मोदी शहांना सांगितलं की मी माझं काम केलंय. आता पुढचं काम तुम्ही करा. त्यानंतर मोदीजींनी धनुष्य़ चिन्ह व शिवसेना नाव त्यांना दिलं. या कटाचे खरे सूत्रधार मोदी व शहा आहेत. मोदी व शहाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांसोबत मिंधे गटाची देखील सालटी काढली.

”अमित शहा कालपरवा कडे वसईत शिवसेनेला नकली सेना बोलून गेले होते. ते अमित शहा मला बोलतात 370 कलम काढलं त्यावर उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे. तुमच्या त्या निर्णयाला आम्ही जाहीर पाठिंबा दिला होता. पण खरंच तुम्ही 370 कलम काढलंय का? काश्मीर शांत झालंय का? काश्मीरमधील पंडित आपल्याच देशात निर्वासित होऊन पसरले होते ते घरी परतले आहेत काय़? त्या कश्मिरी पंडितांना फक्त हिंदुहृदयसम्राटांनी जवळ केलं होतं. तुम्ही तेव्हा कुठेच नव्हतात. मागे एक सभा झाली त्यावेळी आपले वकील असिम सरोदे यांनी एक कायदेशीर मुद्दा मांडला. केंद्र सरकारने 370 कलम काढलेले नाही. त्याची वैधानिक प्रक्रीया अद्याप केलेली नाही. त्या 370 कलमाचं 370 ब जे पोटकलम आहे ते निष्प्रभ केलं आहे. त्याचा परिणाम असा झालाय की कश्मीरमध्ये जागा विकत घेण्याची जी बंदी होती, ती बंदी उठवली गेलीय. त्याचा फायदा अदानीला झालाय. अदानीने कश्मीरमध्ये सर्वात जास्त जमीन घेतली आहे. तिथे लिथियमचा सर्वात मोठा साठा आहे. त्या लिथियमचा उपयोग मोबाईलच्या सेलपासून हार्टच्या उपकरणामपर्यंत इलेक्ट्रिक व्हेहिकलसाठी लिथियचा वापर केला जातो. तुम्ही देशासाठी 370 कलम नाही काढलं, अदानीसाठी काढलं. आता अचानक संशय येऊ नये म्हणून मोदी अदानी व अंबानीबद्दल बोलले. ज्याच्या विमानात तुम्ही फिरलात त्या अदानीबद्दल तुम्ही बोललात. अदानी व अंबानीकडून टेम्पो भरून काळा पैसा किती घेतला असा सवाल मोदींनी राहुल गांधींना केला. जेव्हा हे काळ्या पैशाचे टेम्पो जात होते त्यावेळी तुमचा ईडी सीबीआय का तंबाखू मळत बसले होते का? तरी देखील काळा पैसा गेला असेल तर तुम्ही जी नोटबंदी केली होती. आमच्यावर नोटबंदी लादली होती ती अपयशी ठरली आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदी म्हणतात 2014 ला मला गंगा माँ ने मला बोलावलेलं. आता वाटतं मला गंगा माँ ने दत्तक घेतलंय. गंगा माँ ने बोलवलं होतं त्याच गंगेत कोरोना काळात मृतदेह फेकलेले तेव्हा त्या गंगेचे अश्रू दिसले नव्हते का? गंगेने मृतदेह फेकायला बोलावलेलं का? मोदीजी हे तुम्ही विसरले असाल पण गंगा माँ आणि देश विसरलेला नाही. गंगेसाठी काय केलं तुम्ही. गंगेचा अपमान केलात. कोरोना काळात गुजरातमध्ये मैदानात सार्वजनिक चिता पेटलेल्या. आणि तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताय. त्या कठीण काळात जगभरात संकट असताना संपूर्ण देशात नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव होतं. पण हे माझं श्रेय नाही हे तुमचं सहकार्य आहे. हे माझं कर्तृत्व नाही माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले