दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे, जागे रहा! उद्धव ठाकरे यांचे तमाम शिवसैनिकांना, शिवसेनाप्रेमींना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही केवळ ‘धनुष्यबाण’ नाही गोठवलंत तर ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी अस्मिता जपली आणि शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंना जी हिंमत दिली, ती हिंमत तुम्ही गोठवलीत!

‘निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव गोठवले. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाणाची मनोभावे पूजा करायचे. आजही तो त्यांच्या देव्हाऱ्यात पूजला जातो. पण 40 डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे पवित्र धनुष्यबाण गोठवले,’ असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंधे गटावर केला. शांत डोक्याने, पण आत्मविश्वासाने आपल्याला मोठी लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकल्यावर आपल्याला आव्हान देणारे कुणीही नसेल असे सांगतानाच, ‘दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे, अजिबात झोपू नका, जागे रहा!’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींना केले.

वापरून झाल्यावर भाजपवाले मिंध्यांना कचऱ्यात फेकतील

‘अनेकदा टीव्ही लावल्यावर आपण जाहिराती बघतो. पंखा, गाडी, सरबताच्या जाहिराती असतात. अमिताभजी एका सरबताची जाहिरात करताहेत. आपण त्या सरबताची बाटली विकत घेतो. ती जपून वापरतो. फ्रिजमध्ये ठेवतो. पण सरबत संपल्यावर कचऱ्याच्या टोपलीत फेकतो. डब्यात फेकतो. तसेच मिंधे गटाचे होणार आहे. त्यांचा उपयोग ज्याक्षणी संपेल त्यावेळी त्यांना भाजपवाले फेकून देतील. आणि आता त्यांचा वापर संपत चालला आहे. कारण चिन्ह गोठवले. जो गोंधळ घालायचा होता तो घातलेला आहे.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा तसेच शिवसेना हे नाव न वापरण्याचा हंगामी निर्णय पेंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दिला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी मिंधे गटाचा जोरदार समाचार घेतला. ‘ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली तिचा घात करायला निघालात, मराठी माणसाची एकजूट पह्डायला निघालात. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलंत. या देशात हिंदू म्हणायची कुणाला हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ती दिली. शिवसेनाप्रमुखांनी दिलेली ती हिंमत तुम्ही गोठवली. हिंदुत्व असेच मिळालेले नाही. त्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी अंगावर अनेक धोके, संकटे घेतली. शिवसेना या नावाशी तुमचा संबंधच काय? प्रबोधनकारांनी जे दिले, शिवसेनाप्रमुखांनी जे रुजवले त्याचा तुम्ही घात करताय,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटावर घणाघात केला.

…हे अति होतेय!

‘शिवसेनाप्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्रीपदी नको, ते पद मलाच पाहिजे, ती खुर्ची मलाच पाहिजे असे म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. ज्यांना सर्वकाही देऊनही मनात धुसफूस, नाराजी होती तेसुद्धा गेले. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रीपदी नको असा हट्ट, असे मनसुबे असू शकतात. पण आता शिवसेनाप्रमुख व्हायला निघालेत हे अति होतेय,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. अशी इच्छा बाळगणाऱयांनी स्वतःचा आवाका काय याचाही विचार करायला हवा, अशी टीकाही त्यांनी केली.

  हेच तुमचे हिंदुत्व आहे का?

‘दसरा मेळाव्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे आता शिवसैनिकांना दमदाटी करणे सुरू आहे. आणीबाणीच्या काळात तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जे केले नव्हते ते तुम्ही करताय. त्यावेळीही शिवसैनिकांवर खटले दाखल केले जात होते. तडीपाऱ्या होत होत्या. शिवसेनेवर बंदी घालायची मागणी स्थानिक नेत्यांनी केली होती. पण इंदिरा गांधींनी बंदी घातली नाही. आज काँग्रेसबरोबर गेल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे जे बोलताहेत ते आता काय करताहेत? ज्या शिवसैनिकांनी घरादाराचा त्याग करून तुम्हाला मोठे केले त्यांनाच छळता? ज्या शिवसैनिकांच्या जोरावर तुम्ही मोठे झालात, त्यांना धमक्या देताना काहीच वाटत नाही का? हेच तुमचे हिंदुत्व आहे का?’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटावर केली.

‘काँग्रेसबरोबर जाऊन आम्ही हिंदुत्व सोडले असा आरोप करता, मग ज्या भाजपाचे शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेस बसला आहात. तर पापी कोण… काँग्रेस की भाजपा?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाला विचारला.

चिन्ह गोठवले हा अन्यायच!

धनुष्यबाण चिन्ह गोठवले हा अन्यायच असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘16 जणांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. घटनेनुसार त्यासंदर्भात निकाल लागला तर मिंध्यांचे बारा वाजणार आहेत. मुळात तेच अपात्र ठरले तर आजचे गोठवलेपण आहे त्याची जबाबदारी कोणाची? माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता नक्की न्याय करेल अशी खात्री आहे.

आज अनेक जणांचे मला पह्न आले. काही जण अक्षरशः रडत होते. मी सहा वर्षांचा होतो तेव्हा 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. स्थापनेचा नारळ आमच्या शिवाजी पार्कच्या घरातच वाढवला गेला. त्या नारळातून जे पाण्याचे तुषार उडाले ते मला एवढे चिंब भिजवून टाकतील याची कल्पनाच नव्हती. शिवसेनेचे पक्षप्रमुख पद स्वीकारावे लागले. नंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवले होते, पण आज शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये मी भिजतोय. ते दुःखाचे नाहीत. उद्वेगाचे, रागाचे, चिडीचे आहेत. संकटे येतात आणि जातात. पण या संकटांमध्ये संधी दडलेली असते. या संधीचे मी सोने करून दाखवेन.

अभूतपूर्व दसरा मेळाव्यासाठी धन्यवाद!

शिवसेनेचा यंदाचा पारंपरिक दसरा मेळावा अभूतपूर्व आणि अद्भुत होता असे सांगत मेळाव्याला उपस्थित तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी धन्यवाद दिले. दसरा मेळावा होऊ नये, मैदान शिवसेनेला मिळूच नये म्हणून खोकासुरांनी प्रयत्न केला होता, परंतु न्यायदेवतेने न्याय दिला असे ते म्हणाले. मिंधे गटाच्या दसरा मेळाव्यावरही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ‘एका ठिकाणी पंचतारांकित सुविधा होत्या आणि दुसरीकडे साधेसुधे शिवसैनिक. काही दिव्यांग होते. काही नेत्रहीन होते. काही दूरवरून चालत आले होते. काय सोय होती? ना गाडय़ा होत्या ना पंचपक्वान्न. स्वतःची मीठभाकर घेऊन शिवसैनिक आले होते. अर्धी भाकरी खाईन, पण मेळाव्याला जाईन. एकच जिद्द होती…शिवतीर्थ आणि शिवसेना.’ उद्धव ठाकरे…कोण उद्धव ठाकरे?…उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे आणि शिवसैनिक मानतात म्हणून आम्ही आहोत, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना संकटाच्या छाताडावरून चालून जाईल

‘तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर बाळासाहेबांचे नाव न वापरता जनतेच्या समोर या. स्वतःचा पक्ष काढा. भाजपात जा. तुम्हाला प्रत्येक वेळी बाळासाहेबांनी जपले. पण आज तुम्हाला शिवसेना पाहिजे, धनुष्यबाण पाहिजे, पण बाळासाहेबांचा मुलगा नको. कारण ठाकरे वगळून जी शिवसेना राहील ती तुम्हाला तुमच्या गोशाळेत बांधायची आहे. पण लक्षात ठेवा! शिवसेना हा वाघ आहे. शिवसेना कधीच संपणार नाही, उलट ती संकटाच्या छाताडावर चालून जाईल.’ अशा शब्दांतही उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाबरोबर भाजपावरही निशाणा साधला.

काळीज आहे, पण उलटे आहे, रक्त गोठलेले आहे अशा माणसांचा पंपू फिरतोय. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्याच काळजात कटय़ार घुसवलीत. आता आनंदाने उकळ्या फुटत असतील त्यांना. त्यापेक्षा त्यांच्यामागे जी महाशक्ती आहे तिला जास्त आनंद होत असेल.

तीन चिन्हे, तीन नावे

त्रिशूळ

उगवता सूर्य

मशाल

निवडणूक आयोगाने लवकर निर्णय द्यावा

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आपण तत्काळ त्यांना तीन चिन्हे दिली आहेत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल ही चिन्हे राज्यातील जनतेला दाखवली. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला दिलेले नावाचे पर्यायही जनतेसमोर उलगडले.

उद्धव ठाकरे म्हणाले,

पहिले नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे

दुसरे नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे

तिसरे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

निवडणूक आयोगाने शिवसेनेने दिलेली तीन चिन्हे आणि तीन नावे जनतेला सांगितली आहेत, मात्र समोरच्यांनी काय सादर केले याची माहिती दिलेली नाही. त्यांना जे सादर करायचे ते करू द्या, पण निवडणूक आयोगाने आम्ही जी नावे आणि चिन्हे दिली आहेत त्यापैकी एक चिन्ह आणि एक नाव लवकरात लवकर द्यावे. अंधेरीची पोटनिवडणूक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीखही काही दिवसांवर आहे. तेव्हा जनता जनार्दन जो काही फैसला करेल तो मान्य आहे.