गद्दारांना घरी बसवा! उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘शिवसेनेशी गद्दारी केलेल्या गद्दारांना केवळ घरी पाठवू नका, तर घरी बसवा. गद्दारांना गाड़ून मला माझा भगवा परत हवा आहे,’’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. संभाजीनगर जिह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.

 उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. सर्व गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवू, असा शब्द या कार्यकर्त्यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांना दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी वरील आवाहन केले. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे-पाटील व डॉ. पांडुरंग राठोड, माजी पंचायत समिती सदस्य महादेव ढोके व लक्ष्मण झिणे, तालुका उपाध्यक्ष मोहनराव निळ, युवा मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज भुमरे, रेणुकादेवी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर बोडखे यांनी आज भाजपला रामराम करत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचेही वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आज शिवसेनेत दाखल झाले. त्यात वैजापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर, तालुका अध्यक्ष अॅड. प्रतापराव पाटील-निंबाळकर, प्रतापराव पाटील-धोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी हाती शिवबंधन बांधले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते.