
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बस स्थानकाची मोठी दुरावस्था झालेली आहे. या बस स्थानकाला बरीच वर्षे झाल्याने आता त्याची पडझड झाली आहे. येथे येणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांकरिता हे बस स्थानक म्हणजे धोक्याचे ठिकाण बनले आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेले उदगीर शहर आहे. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त असते. उदगीर बस स्थानकाचे बांधकाम 40 वर्षांपूर्वी झाले होते. सध्या हे बस स्थानक प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
बस स्थानकाच्या मुख्य प्रवेश करण्याच्या ठिकाणीच मोठी सळई उघडी पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करायला त्रास होतो. भिंतीस ठिकठिकाणी आणि छतास भेगा पडल्या आहेत. या बस स्थानकाच्या आतल्या बाजूस प्रवासी निवाऱ्यासाठी बसतात तिथे पावसाळ्यात सर्व बाजूंनी पाणी गळते. प्रवासी जीव मुठीत धरून बसची वाट पाहत या बस स्थानकात बसतात. तसेच बस स्थानकाची भिंत कुठल्याही क्षणी कोसळू शकते, अशा अवस्थेत आहे.
तसेच छताचा भाग कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तर हे बस स्थानक म्हणजे जनावरांचा गोठा बनतो. शहरातील गाई, म्हशी, कुत्रे, डुक्कर, गाढव अशी सर्व मोकाट जनावरे या बस स्थानकात निवऱ्यासाठी येऊन बसतात. बस स्थानकाच्या आवारातील रस्तावरही सर्वत्र खड्डे पडलेले आहेत.
उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीरच्या बस स्थानकाच्या दुरुस्तीचे कामकाज लवकरच हाती घेणार, अशी घोषणा केली होती. मात्र अद्याप बस स्थानकाची दुरुस्ती झालेली नाही.
डिसेंबर 2017 मध्ये आधुनिक पद्धतीच्या बस स्थानकाची मागणीसुद्धा नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार जानेवारी 2018 मध्येच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 9 कोटी रुपयांच्या अंदाज पत्रकासह आधुनिक पद्धतीच्या बस स्थानकाचे डिझाईन सरकारकडे सादर केले होते, असेही सांगितले होते. मात्र अजूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. उदगीरचे बस स्थानक लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी येथील प्रवासी करत आहेत.































































