उदगीर शहरात नागरिकांचा स्तुत्य उपक्रम, गतीरोधकावर मारले पांढरे पट्टे

सामना प्रतिनिधी । उदगीर

सर्व गोष्टी शासनच करणार ही मानसिकता बदलून पुढाकार घेत उदगीर शहरातील नागरिकांना एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. उदगीर मधील जिवग मित्रमंडळाच्या वतीने रस्त्यावरील गतीरोधकावर पांढरे पट्टे मारून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गतीरोधकाचा अंदाज येण्यास मदत होणार आहे.

उदगीर येथील येणकी-माणकी रस्त्यावर जनावरांचा बाजार भरवण्यात येत असतो. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने गतीरोधक बांधण्यात आलेले आहेत. परंतू या गतिरोधकावर पांढरे पट्टेच मारण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना गतीरोधक दिसून येत नव्हते व त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले होते. उदगीर येथील जिवलग मित्रमंडळाच्या सदस्यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वखर्चातून गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचा उपक्रम राबवला. त्यामुळे वाहनधारकांना गतीरोधकाचा अंदाज येऊ लागला आणि वाहनांचे होणारे अपघात कमी झाले आहेत.